सीमा भिंत पडून मजूर पती-पत्नीचा मृत्यू, तळवडे येथील घटना: एक मजूर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 00:10 IST2026-03-14T00:10:10+5:302026-03-14T00:10:36+5:30
Pimpri News: तळवडे येथील एका कंपनी बाहेरील सीमा भिंतीचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि१२) दुपारी पावणे पाचच्या सुमारास अपघात घडला. भिंत कोसळून पती-पत्नी मजुरांचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे.

सीमा भिंत पडून मजूर पती-पत्नीचा मृत्यू, तळवडे येथील घटना: एक मजूर जखमी
पिंपरी - तळवडे येथील एका कंपनी बाहेरील सीमा भिंतीचे काम सुरू असताना शुक्रवारी (दि१२) दुपारी पावणे पाचच्या सुमारास अपघात घडला. भिंत कोसळून पती-पत्नी मजुरांचा मृत्यू झाला. तर एक कामगार जखमी झाला आहे.
देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन शंकर राठोड ( वय ३०), कोमल सचिन राठोड (वय २५, दोघेही राहणार चाकण) असे अपघाती मृत्यू झालेल्या दांपत्याचे नाव आहे. या अपघातात मनोहर भिकू चव्हाण (वय ४०) हा मजूर जखमी झाला आहे.
तळवडे जोतिबानगर औद्योगिक परिसरातील एका कंपनी बाहेर सीमा भिंतीचे काम सुरू होते. त्यासाठी ठेकेदाराने मजूर अड्ड्यावरून मजुरांना आणले होते. बांधकामासाठी सिमेंटचे ब्लॉक वापरले जात होते. सायंकाळी साडेचारपर्यंत नऊ फुट भिंत उभारण्याचे काम पूर्ण झाले. त्याचवेळी भिंत कोसळली आणि त्यामध्ये पती-पत्नीसह तिघेजण गाडले गेले. अपघात घडताच तातडीने तेथील अन्य कामगारांनी ढिगार्यात गाडलेल्या त्या तिघांना बाहेर काढले. उपचारासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. एक जण जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.