Krishnarao Bhegade Passes Away : मावळच्या विकासाचा झंझावाती शिल्पकार हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 09:06 IST2025-07-01T09:06:10+5:302025-07-01T09:06:42+5:30

- तालुक्याला प्रगतिपथावर नेणारे प्रतिभासंपन्न, ध्येयवादी नेतृत्व काळाच्या पडद्याआड : उदारमतवादी, व्यासंगी, कार्यतत्पर, सहिष्णू व्यक्तिमत्त्वाच्या

Krishnarao Bhegade Passes Away The architect of Maval's stormy development has passed away | Krishnarao Bhegade Passes Away : मावळच्या विकासाचा झंझावाती शिल्पकार हरपला

Krishnarao Bhegade Passes Away : मावळच्या विकासाचा झंझावाती शिल्पकार हरपला

पिंपरी : मावळ परिसराला प्रगतिपथावर नेणारे प्रतिभासंपन्न, ध्येयवादी नेतृत्व अशी माजी आमदार कृष्णराव धोंडिबा भेगडे यांची ओळख होती. मावळच्या विकासाचा झंझावाती शिल्पकार हरपला, अशी भावना त्यांच्या निधनानंतर तालुक्यातून व्यक्त होत आहे.

अत्यंत प्रेमळ, हसतमुख, तितकेच भिडस्त, उदारमतवादी, व्यासंगी आणि कार्यतत्पर, सहिष्णू व्यक्तिमत्त्व असलेल्या कृष्णराव भेगडे यांना उत्तम वक्तृत्वाची देणगी लाभली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण तळेगावात झाले. दहावी व बारावी मॉडर्न हायस्कूलमधून, तर फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यांच्यावर यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा प्रभाव होता. शालेय जीवनापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आवडायचे.

तळेगावावर आधीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव राहिला. लहानपणीच त्यांच्यावर संघसंस्कार झाले. भारतीय जनसंघाच्या शाखेच्या स्थापनेसाठी अटलबिहारी वाजपेयी तळेगावी आले होते. त्यांच्या उपस्थितीत भेगडे जनसंघाचे कार्यकर्ते बनले. विधानसभेच्या १९५७च्या निवडणुकीत मावळ-मुळशीची उमेदवारी जनसंघाने रामभाऊ म्हाळगींना दिली. ते आमदार झाले. त्यांच्या आमदारकीच्या कालखंडात भेगडे यांनी मावळ तालुक्यात जनसंघाच्या सचिवपदाची धुरा सांभाळली. आमदार म्हाळगींच्या सतत संपर्कामुळे त्यांच्यातील शिस्त, कार्य, निष्ठा, निःस्वार्थीपणा हे गुण आत्मसात केले. १९६२ मध्ये तळेगाव दाभाडे नगरपालिकेची निवडणूक झाली, तेव्हा भेगडे निवडून आले आणि सत्ता मिळविली. नगर परिषदेच्या दुसऱ्या निवडणुकीत सर्वच्या सर्व नगरसेवक जनसंघाच्या तिकिटांवर निवडून आले. भेगडे यांनी १९६२ ते १९७२ या काळात नगरसेवक व काही काळ नगराध्यक्षपद भूषविले.

विधानसभेच्या १९६७च्या निवडणुकीत त्यांना जनसंघाने मावळची उमेदवारी दिली. त्यांचा अवघ्या ४५० मतांनी पराभव झाला. या पराभवातच विजयाची बीजे रुजली होती. १९७२ च्या निवडणुकीमध्ये ते जनसंघाचे आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले, तर, रामभाऊ म्हाळगी शिवाजीनगर पुण्यातून निवडून आले. विधिमंडळ कामकाजात म्हाळगींच्या मार्गदर्शनाचा भेगडेंना लाभ झाला. भेगडे यांनी मांडलेल्या मावळच्या विकासाच्या प्रश्नांमध्ये शंकरराव पाटील व शरद पवार यांनीही लक्ष घातले. त्यामुळे मावळातील रस्ते, पूल, पाटबंधारेच्या अनेक योजना, तळेगाव व लोणावळा नगर परिषदांच्या नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्या. प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधा, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण सुविधा, आदिवासींसाठी घरकुल योजना, वडेश्वर आश्रमशाळा, तंत्रशिक्षणासाठी लोणावळा आयटीआय, ग्रामीण विद्युतीकरण, ग्रामीण नळ पाणीपुरवठा, डोंगरी विकासाच्या अनेकविध कामांचा यामध्ये समावेश राहिला.

काही वर्षांपूर्वी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत कृष्णराव भेगडे म्हणाले होते, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा माझ्यावर प्रभाव पडला होता. मुंबई भेटीत शरद पवार मला मुद्दाम त्यांच्या भेटीला घेऊन गेले. बहुजन समाजातील होतकरू, कार्यक्षम व कर्तबगार तरुण अशी माझी ओळख करून दिली. चव्हाणसाहेबांनी हस्तांदोलन करीत हसत माझ्या पाठीवर थाप मारली. यशवंतरावांच्या बेरजेच्या राजकारणाला मी प्रतिसाद देण्याचा निर्णय घेतला.’

मावळ मतदारसंघाने चमत्कार घडविला

१९७६ मध्ये यशवंतरावांच्या उपस्थितीमध्ये तळेगाव दाभाडेतील सभेत भेगडे यांचा काँग्रेसप्रवेश झाला. मावळमधून काँग्रेसने उमेदवारी दिली. ज्येष्ठ नेते नथूभाऊ भेगडे-पाटील जनता पक्षाचे उमेदवार होते. कृष्णराव भेगडेंचे पक्षांतर, संपूर्ण देशात काँग्रेसविरुद्ध प्रक्षोभ अशा वातावरणात ते काँग्रेसचे उमेदवार होते, परंतु मावळ मतदारसंघाने चमत्कार घडविला. त्यांना भरघोस मताधिक्याने निवडून दिले.

शरद पवारांची पाठराखण केली

१९७६ मधील निवडणुकीनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले, तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री. तिरपुडे यांच्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एक गट सरकारमधून बाहेर पडला व पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना करून सत्ता संपादन केली. पुढील काळात पवारांच्या जीवनात चढ-उतार आले. भेगडेंनी मात्र त्यांची पाठराखण केली. त्यांची १९८० मध्ये जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली. १९८९-९२ पर्यंत त्यांनी सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळली. विदुरा तथा नानासाहेब नवले खासदार झाल्यानंतर जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी भेगडे यांची निवड झाली.

Web Title: Krishnarao Bhegade Passes Away The architect of Maval's stormy development has passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.