‘तू मला भेटली नाहीस तर बदनामी करेन’, तरुणाचे महिलेशी गैरवर्तन
By नारायण बडगुजर | Updated: July 13, 2022 16:42 IST2022-07-13T16:42:12+5:302022-07-13T16:42:22+5:30
आरोपीने फिर्यादीचा वेळोवेळी पाठलाग करून जवळीक साधण्याचा केला प्रयत्न

‘तू मला भेटली नाहीस तर बदनामी करेन’, तरुणाचे महिलेशी गैरवर्तन
पिंपरी : महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तू मला भेटली नाहीस तर बदनामी करेन, असे म्हणत तरुणाने महिलेशी गैरवर्तन करत विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही घटना जून २०२१ ते ११ जुलै २०२२ या कालावधीत धावडे वस्ती भोसरी येथे घडली.
नितीन संजय गुडदे (वय २६, रा. दिघी रोड,भोसरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२१ या महिन्यात फिर्यादीला पाहून आरोपीने इशारे करून तिचा पाठलाग केला. तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. याबाबत फिर्यादीच्या पतीने आरोपीला समजावून सांगितले. त्यानंतरही आरोपीने फिर्यादीचा वेळोवेळी पाठलाग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ११ जुलै रोजी आरोपीने फिर्यादीच्या घरासमोर येऊन त्यांना वाईट इशारे करून जोरजोरात आवाज दिला. फिर्यादीला भेटण्यासाठी घराबाहेर बोलावून त्यांच्या घरात घुसण्याचा आरोपीने प्रयत्न केला. तू भेटली नाहीतस, माझ्याशी मैत्री ठेवली नाहीस तर तुझी बदनामी करेन, तुला सोडणार नाही, अशी धमकी आरोपीने दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.