शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण
By प्रकाश गायकर | Updated: April 10, 2024 20:17 IST2024-04-10T20:16:25+5:302024-04-10T20:17:59+5:30
उन्हाची तीव्रता लक्षात घेता मुस्लीम बांधवांनी वेळेची मर्यादा पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

शहरातील इदगाह मैदान सज्ज; सामुहिक नमाजपठण, पिंपरी चिंचवडमध्ये रमजान ईदची तयारी पूर्ण
पिंपरी : शहर व परिसरामध्ये मुस्लीम बांधव गुरुवारी (दि. ११) रमजान ईद साजरी करणार आहेत. यानिमित्ताने शहरातील इदगाह मैदानावर तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ही मैदाने सामुहिक नमाजपठणासाठी सज्ज झाली असून गुरूवारी सकाळी नमाज पठण केले जाणार आहे.
रमजान पर्वचे तीस उपवास बुधवारी (दि.१०) सायंकाळी पूर्ण झाले. गुरूवारी पारंपारिक पद्धतीने ईद साजरी केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील इदगाह मैदानावर नमाज पठण करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शहरामध्ये नेहरूनगर, काळेवाडी, चिंचवड आणि भोसरी या चार ठिकाणी इदगाह मैदान आहेत. तर शहर व उपनगरामध्ये ११० ठिकाणी मस्जिद आहेत. त्या सर्व ठिकाणी तयारी पूर्ण झाली आहे. गुरूवारी सकाळी ९ वाजता पहिली नमाज पठण होणार आहे. तर त्यानंतर दहा वाजता दुसऱ्यांदा नमाज पठण केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील मस्जिदची रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मस्जिद व इदगाह मैदानांवर ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात आली आहे. इदगाह मैदानावर पाण्याची सोय करण्यात आली आहे. नेहरुनगर येथील इदगाह मैदानावर पाण्याने स्वच्छता करण्यात आली आहे.
बाजारपेठेत उत्साह
रमजान ईद साजरी करण्यासाठी नवीन कपडे, तसेच घराच्या सौंदर्यासाठी विविध वस्तूंची खरेदी केली जाते. गेल्या काही दिवसांपासून बाजारात वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी वाढलेली आहे. शहरातील पिंपरी कॅम्प, भोसरी, चिंचवड बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होत आहे. यात कपडा बाजारातील गर्दीचे प्रमाण अधिक आहे. सणासाठी पठाणी, अफगानी या कपड्यांची ‘क्रेझ’ कमी झालेली नाही. याशिवाय सलवार कमीज, कुर्ता पायजाम्यासह अन्य पारंपरिक पोषाखांचीही चांगली मागणी आहे. शिरखुर्रमासाठी काचेची भांडी खरेदीसाठी गर्दी होत आहे. तसेच अत्तरलाही चांगली मागणी आहे.
कमिटीसोबत बैठक
पोलिस प्रशासनाने इदगाह मैदान व मस्जिद याठिकाणी पाहणी केली आहे. तसेच मस्जिद कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक घेत नियोजन केले आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता मुस्लीम बांधवांनी वेळेची मर्यादा पाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
रमजान ईदसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मैदाने सज्ज करण्यात आली आहेत. तसेच शहरातील सर्व मस्जिदवर आकर्षक रोषणाई केली आहे. त्याठिकाणीही तयारी पूर्ण झाली आहे. यंदा बाजारपेठेत देखील चांगला उत्साह आहे. - मुन्नाफ तरासगार, विश्वस्त, तवकल्लाह जामा मस्जिद कमिटी नेहरुनगर.