पिंपरी परिसरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, वीजपुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 19:52 IST2020-03-28T19:38:44+5:302020-03-28T19:52:31+5:30
शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, वाकड, ताथवडे, पुनावळे या भागात पावसाची हजेरी

पिंपरी परिसरात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, वीजपुरवठा खंडित
पिंपरी : महापालिकेसह मुळशी आणि मावळच्या काही भागात शनिवारी सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहर लॉकडाऊन असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. नागरिकांनी घरीच बसून पावसाचा आनंद घेतला. तर वादळी पावसामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने पिंपरी-चिंचवड शहर लॉकडाऊन केले आहे. संचारबंदीमुळे शहरातील दळणवळण ठप्प झाले आहे. दुध, किराणा, भाजीपाला अशा जीवनावश्यक सेवा वगळता पूर्णपणे शहर बंद आहे.
आज सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. सकाळी अकरानंतर आकाशात ढग यायला सुरूवात केली. सायंकाळी चारनंतर ढगांचा गडगडाट सुरू झाला. सायंकाळी सहाला हलक्या पावसाच्या सरी यायला सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाट सुरू झाला. साडेसहा ते पावणे सात या कालखंडात जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, कासारवाडी, मोशी, चिखली, वाल्हेकरवाडी, थेरगाव, किवळे, पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, वाकड, ताथवडे, पुनावळे या भागात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पिंपरीतील काही भागांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे घरीच असणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
रस्ते ओस....
कोरोनामुळे शहरातील रस्ते ओस पडले आहेत. सायंकाळी नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यास घराबाहेर पडत असतात. मात्र, पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. अचानक आलेल्या पावसामुळे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची धांदल उडाल्याचे दिसून आले. चौकाचौकात तपासणीसाठी असणारे कर्मचारी आडोशाला उभे असल्याचे दिसून आले.