हरिनामाचा गजर! तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरने संगमनेरमधील बोटाला मार्गस्थ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 10:47 IST2024-12-23T10:47:00+5:302024-12-23T10:47:10+5:30
देहूपासून मार्गावरील ४० मंदिरांवर पुष्पवृष्टी करत पादुका हेलिकॉप्टरने बोट्यात पोहोचल्या

हरिनामाचा गजर! तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टरने संगमनेरमधील बोटाला मार्गस्थ
देहूगाव : जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यासाठी तुकोबांच्या पादुका श्री संत तुकाराम महाराज मंदिर येथून संगमनेर येथील बोटा या गावी नेण्यात आल्या. हरिनाम गजरात पुणे ते बोटा या मार्गावरील विविध मंदिरांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली.
श्रीक्षेत्र देहू येथून संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज संभाजी मोरे देहूकर, जालिंदर गागरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात आली. कोरेगाव येथील हेलिपॅडवरून रविवारी दुपारी दोनच्या सुमारास पादुका हेलिकॉप्टरमधून बोटा गावाकडे नेण्यात आल्या. मार्गावरील श्रीक्षेत्र आळे येथील रेडा समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी केली.
या मार्गावरील आई कळमजाई माता मंदिर मोरदरा, मळगंगा माता मंदिर म्हसवंडी, रामदास बाबा मंदिर बेलापूर, भोजामाता मंदिर भोजदरी, खंडोबा मंदिर वनकुटे, हनुमान मंदिर कोठे खुर्द, हनुमान मंदिर जवळेबाळेश्वर, कळमजाई माता महाल वाडी, श्री खंडोबा मंदिर सावरगाव घुले, श्रीक्षेत्र बाळेश्वर शिखर मंदिर, शिव मंदिर पोखरी बाळेश्वर, कानिफनाथ मंदिर तळेवाडी, बिरोबा महाराज मंदिर साकुर, भगवती माता मंदिर नांदुर, विठ्ठल मंदिर येठेवाडी, खंद्रेश्वर मंदिर खंदरमाळ वाडी, काळ भैरवनाथ डोळासणे, म्हसोबा मंदिर वरुडी, काळभैरवनाथ माळेगाव, शनैश्वर मंदिर, आंबी खालसा, हनुमान मंदिर तांगडी, अशा सुमारे ४० मंदिरांवर पुष्पवृष्टी केली. पादुका हेलिकॉप्टरने रविवारी चार वाजता बोट्यात पोहोचल्या.
कीर्तन, प्रवचन सेवा
प्रशांत महाराज मोरे म्हणाले, ही वैभवी पुष्पवृष्टी आणि श्रींचे पवित्र पादुका बोटा येथे मंगलमय धार्मिक कार्यक्रम परंपरांचे पालन करीत आणल्या. या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळ्यात राज्यातील, तसेच जागतिक आणि राष्ट्रीय कीर्तनकार कीर्तन, प्रवचन सेवा देत आहेत. पादुका दर्शनास भाविकांनी मोठी गर्दी केली.