घरकुल वसाहत अंधारात; खंडित वीजपुरवठ्याने नागरिकांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 10:31 IST2024-12-17T10:31:50+5:302024-12-17T10:31:50+5:30
वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय आहे, हे न समजल्याने रहिशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

घरकुल वसाहत अंधारात; खंडित वीजपुरवठ्याने नागरिकांची गैरसोय
चिखली : चिखली येथील सेक्टर क्रमांक १७-१९ मधील घरकुल संकुल परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सोमवारी, दि. १६ रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान संपूर्ण घरकुल परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत पूर्ववत न झाल्याने जवळपास सहा हजार कुटुंबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले.
वीजपुरवठा खंडित होण्याचे नेमके कारण काय आहे, हे न समजल्याने रहिशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. घरकुलमध्ये आयटी क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी वास्तव्यास असल्याने वर्क फ्राॅम होम करणाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. वीजपुरवठा खंडित झाल्याने ज्येष्ठ नागरिक व शालेय मुलांना देखील त्रास सहन करावा लागला.
'मुख्य वीज वाहिनीत बिघाड झाल्याने घरकुलसह इतर काही परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोष निवारण करण्यासाठी यंत्रणा काम करत असून रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.'- श्याम दिवटे, सहायक अभियंता, महावितरण
'तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने घरकुलमधील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तासांत वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही.' - विकासराजे केदारी, स्थानिक रहिवासी