पिंपरी : महिना उलटला तरी आखाती युद्ध सुरूच असल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई तीव्र झाली आहे. महागाई वाढल्याने हॉटेल्ससह खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे रोजचे जेवण आणि नाश्त्याचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.
सध्या हॉटेल, खानावळी आणि हातगाडी चालकांनी खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गाच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. नोकरदार व विद्यार्थी असे सुमारे पाच लाख नागरिक नाश्ता व जेवणासाठी हॉटेल व मेसवर अवलंबून आहेत. मात्र, वाढत्या दरांमुळे त्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे.
गॅसटंचाई आणि महागाईमुळे खर्च वाढला आहे. त्यामुळे नाईलाजाने दरवाढ करावी लागत असल्याचे हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासह महागाईवर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
खाद्यपदार्थ : जुने दर : नवे दर
वडापाव : १५ : २०भजी : ३० : ४०पोहे : ३० : ४०उपमा : ३० : ४०शिरा : ३० : ४०इडली प्लेट : ४० : ६०चहा : १५ : २०मेसचा डबा : ८० : १००सरासरी दरवाढ : २० ते ३० टक्के
विद्यार्थ्यांवर अर्धपोटी राहण्याची वेळ
दरवाढीमुळे काहींना नाश्ता टाळणे किंवा स्वस्त पर्याय शोधावे लागत आहेत. गॅसटंचाईमुळे अनेक खानावळी बंद किंवा अर्धवट सुरू असल्याने विद्यार्थ्यांना दिवसातून एकदाच जेवण करावे लागत आहे. काही विद्यार्थी इंडक्शनवर मॅगी किंवा खिचडी करून दिवस काढत आहेत. स्पर्धा परीक्षार्थींना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
गॅसऐवजी आल्या चुली; चव मात्र बिघडली
गॅसअभावी हॉटेल व्यावसायिकांनी चूल, तंदूर आणि इलेक्ट्रिक शेगडीचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा वेळ १० ते १५ मिनिटांवरून ४० ते ५० मिनिटांपर्यंत वाढला आहे. दरवाढ झाली तरी पदार्थांची चव आणि गुणवत्ता घसरल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.
व्यावसायिकांचीही अडचण
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. काळ्या बाजारात व्यावसायिक गॅस ६ ते ७ हजार तर घरगुती गॅस सिलिंडरसाठी २ ते ३ हजार रुपये मोजावे लागत आहेत. तसेच भाजीपाला, तेल, डाळी, मसाले महाग झाल्याने छोटे-मोठे हॉटेल चालक आणि हातगाडीवाल्यांना ७० ते ८० टक्के तोटा सहन करावा लागत आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई आहे. तेल, डाळी, किराणा, भाजीपाला महागला आहे. वाढत्या खर्चामुळे आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी हॉटेलमधील खाद्यपदार्थांमध्ये २० ते ३० टक्के दरवाढ केली आहे. - तेजस जुनवणे, सचिव, पिंपरी-चिंचवड हॉटेल ॲन्ड रेस्टॉरंट असोसिएशन
गॅस मिळत नसल्याने हॉटेल, हातगाडीवाले आणि फेरीवाल्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. गॅसअभावी ७० ते ८० टक्के तोटा होत आहे. - प्रल्हाद कांबळे, अध्यक्ष, फेरीवाले हॉकर्स संघ
गॅस सिलिंडर मिळत नसल्याने तीन हजारांना शेगडी घेतली. लाकूड विकत आणावे लागते. तेल-बेसन महागले आहे. त्यामुळे वडापाव आणि भजीचे दर वाढवले आहेत. - प्रवीण नौकुडकर, विक्रेते
Web Summary : Pimpri residents face rising food costs due to gas shortages caused by the ongoing conflict. Hotel food and street food prices have increased by 20-30%, impacting daily meal budgets. Students and workers struggle as mess and hotel costs surge.
Web Summary : जारी संघर्ष के कारण गैस की कमी से पिंपरी के निवासियों को भोजन की बढ़ती लागत का सामना करना पड़ रहा है। होटल के भोजन और स्ट्रीट फूड की कीमतों में 20-30% की वृद्धि हुई है, जिससे दैनिक भोजन बजट प्रभावित हो रहा है। मेस और होटल की लागत बढ़ने से छात्र और श्रमिक जूझ रहे हैं।