झोपायचं नाटक केलं अन् मित्राचीच केली निर्घृण हत्या; जेवण बनवण्यावरुन झाला होता वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 19:44 IST2024-11-04T19:40:55+5:302024-11-04T19:44:39+5:30

पिंपरी चिंचवडमध्ये जेवण करण्यावरून झालेल्या वादानंतर झोपलेल्या मित्रावर आरोपीने अचानक रॉडने हल्ला केला.

Friend kills a young man over a dispute over cooking incident was caught on CCTV | झोपायचं नाटक केलं अन् मित्राचीच केली निर्घृण हत्या; जेवण बनवण्यावरुन झाला होता वाद

झोपायचं नाटक केलं अन् मित्राचीच केली निर्घृण हत्या; जेवण बनवण्यावरुन झाला होता वाद

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जेवण बनवण्याच्या वादातून एका १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे.आरोपीने लोखंडी रॉडने सोबत काम करणाऱ्या तरुणाची निर्घृणपणे हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हत्येची ही घटना तिथल्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये दोन जणांमध्ये झालेल्या जोरदार वादातून एका १९ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाक करण्यावरून झालेल्या वादातून आरोपीने आपल्याच साथीदाराची हत्या केली. आरोपी आणि मयत हे आणखी तिघांसह एका खासगी कंपनीत केअर टेकर म्हणून काम करत होते. दीपू कुमार असे मृताचे नाव असून तो काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड येथे कामासाठी आला होता.

पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथील वीकेवी आटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ही २ नोव्हेंबरला रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत दीपू कुमारचा मृत्यू झाला. दीपू कुमारचा मित्र मुकेश हिरा कुशवाह यानेच त्याचा लोखंडी रॉडने वार करून खून केला. मध्यरात्री दिपू कुमार झोपेत असतानाच त्याच्या डोक्यावर मुकेशने लोखंडी रॉडने जोरदार वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. 

जेवण बनवण्याच्या वादावादीनंतर सर्व कर्मचारी झोपले होते. मात्र त्याचा बदला घेण्यासाठी आरोपी मुकेश कुशवाह जागाच होता. आरोपी मुकेशने लोखंडी रॉड उचलला आणि दीपू झोपला असताना त्याच्या डोक्यात क्रूरपणे मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या शेजारी झोपलेल्या कर्मचाऱ्याला हा प्रकार कळताच त्याने मुकेशला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी आरोपी मुकेशला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Friend kills a young man over a dispute over cooking incident was caught on CCTV