मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज
By नारायण बडगुजर | Updated: December 19, 2023 18:26 IST2023-12-19T18:25:19+5:302023-12-19T18:26:01+5:30
बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली

मोबाइलच्या कर्जासाठी कागदपत्रे घेऊन फसवणूक; परस्पर काढले ५० हजारांचे कर्ज
पिंपरी : मोबाईल खरेदीसाठी कर्ज करून देतो, असे सांगत ग्राहकाकडून कागदपत्रे घेतली. तसेच बनावट सही करून ग्राहकाच्या नावाने बँकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली. याप्रकरणी एकाला अटक केली. पुनावळे येथील साईसिद्धी मोबाईल सेंटर येथे १४ ते १५ जुलै २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
सिकंदर श्रावण भालेराव (४३, रा. पुनावळे) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. १८) रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शरद बाळू जाधव, असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, शरद जाधव हा एका बँकेचा एक्झीकेटीव्ह म्हणून काम करतो. ग्राहकांना मोबाईल घेण्यासाठी शरद जाधव बँकेकडून कर्ज मिळवून देत होता. पुनावळे येथील साई सिद्धी मोबाईल सेंटर येथे फिर्यादी भालेराव मोबाईल घेण्यासाठी आले. मोबाईलसाठी कर्ज होईल का, असे त्यांनी विचारले. मी कर्ज मिळवून देतो, असे जाधव याने सांगितले. त्याने भालेराव यांची कागदपत्रे घेऊन कर्जासाठीची प्रक्रिया केली. मात्र, कर्ज मिळण्यात अडचण आहे, असे सांगत त्याने भालेराव यांना बँकेचे कर्ज मिळवून दिले नाही. त्यानंतर भालेराव यांनी दुसऱ्या बँकेचे कर्ज करून मोबाईल खरेदी केला. मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना बँकेतून फोन आली की, तुम्ही गेली सहा महिने मोबाईल लोनचे हप्ते भरले नाही. त्यावेळी चौकशी केली असता आपल्या नावावर जुलै महिन्यात ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढल्याचे भालेराव यांना समजले. तसेच ही रक्कम व्याजासह ५५ हजार २२९ एवढी झाली असल्याचेही त्यांना बँकेने सांगितले. त्यानंतर भालेराव यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
अशी केली फसणूक...
शरद जाधव याने भालेराव यांच्या नावावर कर्ज मंजूर करून घेत मोबाईल शॉपमधून नवीन मोबाईल घेतला. तो मोबाईल बाजारात विकून त्याचे पैसे स्वत:कडे ठेवले. या फसवणुकीच्या प्रकारानंतर लगेचच शरद जाधव याने दुसऱ्या एका ग्राहकाला फसविण्याची तयारी केली. मात्र, हे करत असताना मोबाईल शॉप मालकाने त्याची तक्रार बँकेकडे केली.
काही मोबाईल शॉपबाहेर लोन करून देणारे असतात. यामध्ये काही तरुण नागरिकांची फसवणूक करतात. कागदपत्रांचा वापर करून परपस्पर कर्ज काढले जाते. मोबाईल लोनच्या नावाखाली फसवणूक झाल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. - प्राची तोडकर, पोलिस उपनिरिक्षक, रावेत