कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १९ महिलांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 19:22 IST2019-04-14T19:20:35+5:302019-04-14T19:22:18+5:30
पतसंस्थेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने १९ महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून १९ महिलांची फसवणूक
पिंपरी : पतसंस्थेतून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने १९ महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश वासुदेव वाघमारे (वय ३८, रा. वल्लभनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनुसया रामा बाबरे (वय ४६, रा. लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाबरे यांचा छोटासा व्यवसाय आहे. एक महिन्यापूर्वी उमेश वाघमारे याने त्यांना वल्लभनगर येथील भारतीय महिला नागरी सहकारी पतसंस्थेतून माझी ओळख आहे असे खोटे सांगून कर्ज मिळवून देतो, असेही सांगितले. त्यानंतर बाबरे यांच्याकडून १ हजार ५० रुपये घेतले. अशाप्रकारे १९ महिलांकडून त्याने पैसे घेतले. मात्र, नंतर काहीही न करता, महिलांना कर्ज मिळवून न देता त्यांची फसवणूक केली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.