हॉटेलमध्ये भागीदारी करण्यास सांगून ५२ लाखांची फसवणूक; हिंजवडीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 21:59 IST2021-04-01T21:59:24+5:302021-04-01T21:59:31+5:30
'यारा दी हवेली' या हॉटेलमध्ये भागीदारी करू, असे सांगून आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेतले.

हॉटेलमध्ये भागीदारी करण्यास सांगून ५२ लाखांची फसवणूक; हिंजवडीत गुन्हा दाखल
पिंपरी : हॉटेलमध्ये भागीदारी करू, असे सांगून विश्वास संपादन करून ५२ लाख ४०० रुपयांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे- बेंगळुरू-मुंबई महामार्गालगत असलेल्या यारा दी हवेली या हॉटेलमध्ये १६ ऑक्टोबर २०१८ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
श्रीकांत विठ्ठलराव गिरी (वय ३३, रा. चिखली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जितेंद्र वेदप्रकाश पुरी उर्फ जीतराज पुरी उर्फ बॉबी पुरी तसेच सुरभी मिश्रा उर्फ सुरभी जितेंद्र पुरी उर्फ चेतना उदय इलापाते (दोन्ही रा. गहुंजे), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यारा दी हवेली या हॉटेलमध्ये भागीदारी करू, असे सांगून आरोपींनी फिर्यादीला विश्वासात घेतले. भागीदारीसाठी करारनामा करून वेळोवेळी विश्वास संपादन करून ५० लाख रुपये लागतील, असे सांगितले. फिर्यादी कडून ३० लाख रुपये रोख व २० लाख ८५ हजार रुपये अकाऊंटवर ट्रान्स्फर करण्यास सांगितले. तसेच फिर्यादीच्या सासऱ्यांच्या अकाऊंटवरून आरोपींच्या बॅंक खात्यावर पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगून फिर्यादी यांची ५२ लाख ४०० रुपयांची फसवणूक केली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे.