हिंजवडी अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हा; बसचालकासह दोघांना पोलिस कोठडी
By नारायण बडगुजर | Updated: December 2, 2025 18:37 IST2025-12-02T18:35:08+5:302025-12-02T18:37:29+5:30
दारूच्या नशेतील चालकाने बस भरधाव चालवून तीन भावंडांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला.

हिंजवडी अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हा; बसचालकासह दोघांना पोलिस कोठडी
पिंपरी : दारूच्या नशेतील चालकाने बस भरधाव चालवून तीन भावंडांना चिरडले. यात तिघांचा मृत्यू झाला. तर एका महिलेसह तिघे जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. १ डिसेंबर) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास हिंजवडी येथील पंचरत्न चौक येथे घडली. याप्रकरणी बसचालकासह दोघांना मुळशी न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत (दि. ४ डिसेंबर) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
बसचा चालक नागनाथ राजाभाऊ गुजर (वय ३३, रा. गौरी पार्किंग, चक्रपाणी रोड, भोसरी, मूळ रा. धाराशिव), सबवेंडर व व्यवस्थापक भाऊसाहेब रोहिदास घोमल (वय ४८, रा. चिंचवड, मूळ रा. अहिल्यानगर) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यासह मैत्रेय ट्रॅव्हल्सचे मालक, ड्रायव्हरची सुरक्षा तपासणी करण्याची जबाबदारी असलेली व्यक्ती यांच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. स्वप्नील पांडुरंग जांभुळकर (२४, रा. पंचरत्न चौक, हिंजवडी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. प्रिया देवेंद्र प्रसाद (वय १६), आर्ची देवेंद्र प्रसाद (८) या दोन बहिणींसह त्यांचा भाऊ सूरज देवेंद्र प्रसाद (६) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला. दुचाकीस्वार अविनाश हरिदास चव्हाण (वय २६) हे गंभीर जखमी झाले. नूर आलम (वय २६) आणि विमल राजू ओझरकर (वय ४०) हे दोघेही यात जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसचालक नागनाथ गुजर याने दारूच्या नशेत मैत्रेय ट्रॅव्हल्सची एमएच १४ एलएल ७२३३ या क्रमांकाची बस हिंजवडी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून वाकड पुलाच्या दिशेने भरधाव घेऊन जात होता. त्यावेळी पंचरत्न चौकात दुचाकीस्वार अविनाश चव्हाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर बसने पदपथावरील पादचारी प्रिया प्रसाद व आर्ची प्रसाद या दोन बहिणींसह त्यांचा भाऊ सूरज प्रसाद यांना जोरदार धडक दिली. यात आर्ची आणि सूरज यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच नूर आलम आणि फिर्यादी स्वप्नील जांभुळकर यांची आत्या विमल ओझरकर यांनाही बसने धडक दिली. बसने पदपथ, इलेक्ट्रिक डीपी व होर्डिंगचेही नुकसान केले.
वाहनमालक व देखरेख करणारे अधिकारी यांनी बसचालक मद्यधुंद असल्यस अपघात होऊ शकतो आणि लोकांचा मृत्यू होऊ शकतो याची माहिती असताना त्यांनी बसचालकाची तपासणी न करता वाहन चालविण्यास दिल्याबद्दल जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार मैत्रेय ट्रॅव्हल्सचे मालक, सबवेंडर व व्यवस्थापक तसेच ड्रायव्हरची सुरक्षा तपासणी करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या विरोधात देखील याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विकास ताकतोडे तपास करीत आहेत.
मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात
अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रिया प्रसाद व अविनाश चव्हाण यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रिया हिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन केले. तसेच आर्ची आणि सूरज या दोघांचे सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तिघांचे मृतदेह मंगळवारी (दि. २ डिसेंबर) नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.