जमिनीच्या वादातून माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताने कोयत्याने केला वार, वाकडमध्ये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2021 20:25 IST2021-05-14T20:25:24+5:302021-05-14T20:25:53+5:30
अनुसूचित जाती-जमाती अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून माजी सहाय्यक पोलीस आयुक्ताने कोयत्याने केला वार, वाकडमध्ये गुन्हा दाखल
पिंपरी : जमिनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून एकावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. तर एकाच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडल्या प्रकरणी माजी सहायक पोलीस आयुक्त गणपत माडगूळकर (वाकड, पिंपरी चिंचवड), त्यांचा वाहन चालक आणि तिघा साथीदारांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल नंदू वाघमारे (वय ३२, रा. वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. वाकड मधील गोल्ड फिंगर सोसायटी जवळील सर्वे नंबर १६७-१६८ जागे समोरील सार्वजनिक रस्त्यावर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी ही घटना घडली. दहशतीमुळे आणि आजारी असल्याने तक्रार करण्यास उशीर झाल्याचा जबाब फिर्यादीने दिला आहे.
वाघमारे यांची वाकड येथे महार वतनाची जमीन आहे. त्याचा दावा दिवाणी न्यायालयात सुरू आहे. न्यायालयात दावा सुरू असताना आरोपीने जमिनीची मोजणी सुरू केली होती. माडगूळकर याने आलिशान गाडी अंगावर घातली. गाडीतून खाली उतरल्यावर त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. खूप उपोषण आणि आंदोलन करतो असे म्हणत कोयत्याने डाव्या हाताच्या दंडावर वार केला. वाहन चालकाने रॉड डोक्यात घातला. मला वाचविण्यासाठी भाऊ तुषार माझ्याकडे पळत आला. त्यावेळी दुसऱ्या चारचाकी गाडीतून तिघे इसम खाली उतरले. त्यांनी भावाच्या डोक्यात बीअरच्या बाटल्या फोडल्या. आरडाओरडा ऐकून आलेल्या आत्याला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. तर, आतेभावाला तुमच्या सगळ्यांची माती करेल अशी धमकी देऊन आरोपी निघून गेल्याचा जबाब फिर्यादीने दिला आहे.
या प्रकारामुळे कुटुंब दहशतीखाली होते. तसेच त्यानंतर मी आजारी असल्याने तक्रार देण्यास उशीर झाल्याचे फिर्यादीने सांगितले. या प्रकरणी माडगूळकर याच्या विरोधात गंभीर दुखापत करणे आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर पुढील तपास करीत आहेत.