कंत्राटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

By Admin | Updated: August 8, 2015 00:25 IST2015-08-08T00:25:10+5:302015-08-08T00:25:10+5:30

एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडीया) विद्यार्थी आंदोलनामुळे संस्थेमधील सर्व कामकाज ठप्प झाले असून, येथील कर्मचाऱ्यांना कोणतेच काम नाही,

Forced leave for contract workers | कंत्राटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा

पुणे : एफटीआयआयच्या (फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडीया) विद्यार्थी आंदोलनामुळे संस्थेमधील सर्व कामकाज ठप्प झाले असून, येथील कर्मचाऱ्यांना कोणतेच काम नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे करारावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर केला जाणारा खर्च हा संस्थेसाठी काय उपयोगाचा, अशी भूमिका घेत अशा करारावर असलेल्या तब्बल ८२ कंत्राटी कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबरपासून सक्तीच्या रजेवर पाठविले जाणार आहे.
५७ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे, अद्याप त्यावर शासनदरबारी कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. हे आंदोलन एक राष्ट्रव्यापी चळवळ बनली असून, विविध संस्था, संघटना, सेलिब्रिटीज यांचा मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आता शासनाने दबावतंत्राचा वापर करीत हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांनाच लक्ष्य केले आहे. आपल्यामुळे कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे, या भावनेपोटी का होईना विद्यार्थी आंदोलनाचे शस्त्र मागे घेतील, हा कुटील डाव यामागे असल्याची चर्चा विद्यार्थ्यांत आहे.
संस्थेत सध्या विविध १६ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जात असून काही ठरावीक कर्मचारी वगळता बहुतांश कर्मचारी हे करारावर सेवेत आहेत. संस्थेत सेवेसाठी त्यांना पगार दिला जातो. मात्र, जवळपास दोन महिने चाललेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे या सर्व कर्मचाऱ्यांवर कामाअभावी बसून रहाण्याची वेळ आली असल्याने त्यांना पुढील महिन्यापासून सक्तीच्या रजेवर पाठ्विण्याचा निर्णय घेतला असल्याचे एफटीआयआयचे संचालक प्रशांत पाठराबे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Forced leave for contract workers