गरजूंना अन्न वाटप करणाऱ्यांना द्यावी लागणार फिटनेस टेस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 15:03 IST2020-03-31T15:01:17+5:302020-03-31T15:03:10+5:30
लाॅकडाऊनमुळे रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांचे हाल हाेत आहेत. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना अन्न वाटप करण्यात येते. परंतु त्यांना आता आपले फिटनेस सर्टिफिकेट द्यावे लागणार आहे.

गरजूंना अन्न वाटप करणाऱ्यांना द्यावी लागणार फिटनेस टेस्ट
किवळे : गरजूंना अन्न व धान्य वाटप करणारे हे आरोग्यदृष्टया तंदुरुस्त नसतानाही ( अनफिट) अन्नधान्य वाटप करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाटप करणाऱ्यांनी स्वतःचे आरोग्य तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र ( फिटनेस सर्टिफिकेट ) देहूरोड पोलीस ठाण्यात सादर केल्याशिवाय ठाण्याच्या हद्दीत कोठेही गरजूंना धान्य व अन्न वाटप करू नये.असे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी कळविले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखप्यासाठी सरकारने लॉकडाऊन लागू केल्यानंतर देहूरोड -देहू परिसरात विविध व्यक्ती व काही संस्था गरजूंना धान्य व अन्न वाटप करीत आहेत. मात्र वाटप करणाऱ्यांमध्ये सर्व जण आरोग्यदृष्ट्या तंदुरुत असतीलच असे नाही. त्यामुळे वाटप करण्याची इच्छा असणारे व सध्या धान्य व अन्न वाटप करीत असलेल्यांनी स्वतःचे आरोग्य तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र देहूरोड पोलीस ठाण्यात सादर करावे. पोलीस ठाण्यातून वाटपाची परवानगी घ्यावी . त्यानंतरच देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाटप करण्यात यावे. परवानगी न घेता व वाटप करणाऱ्याने स्वतः चे मेडिकल न करता धान्य व अन्न वाटप करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर राष्टीय आपत्ती कायदा २००५ , साथ रोग प्रतिबंधक अधिनियम व भादवी कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.