चिखलीत कंपनीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 16:46 IST2018-11-01T16:39:24+5:302018-11-01T16:46:52+5:30
कुदळवाडी चिखली येथील पवार वस्तीतील पंचशील फिल्टर्स या कंपनीला बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली.

चिखलीत कंपनीला भीषण आग
पिंपरी : कुदळवाडी चिखली येथील पवार वस्तीतील पंचशील फिल्टर्स या कंपनीला बुधवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास भीषण आग लागली. यात कंपनीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तब्बल साडेचार तासानंतर आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बाराच्या सुमारास कंपनीला भीषण आग लागली. या घटनेची माहिती राजू गर्जे या नागरिकाने अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. परंतु आग मोठी असल्याने पिंपरी, भोसरी, चिखली, तळवडे, प्राधिकरण, भोसरी एमआयडीसी, हिंजवडी, पुणे मनपा या अग्निशमन गाड्यांना पाचारण करण्यात आले. मात्र पाणी कमी पडत असल्याने अखेर बजाज कंपनी, टाटा मोटर्स, चिखली, कुदळवाडी, जाधववाडी, मोशी येथील गाड्या मागविण्यात आल्या. असे एकूण १५ ते २० टँकर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर पहाटे साडेचार वाजता नियंत्रण मिळवले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कंपनीत प्लास्टिक आणि कागदाचे साहित्य मोठ्या प्रमाणावर होते. ते आगीत जळून खाक झाले आहे. या भीषण आगीमुळे कुदळवाडी चिखली परिसरातील विद्युत पुरवठा खंडित केला गेला. यामुळे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवर याचा परिणाम झाला होता.