...अखेर ‘महामेट्रो’कडून रस्ते दुरुस्तीस सुरुवात; निगडी ते चिंचवड स्टेशन रस्ता होणार खड्डेमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:57 IST2025-10-08T09:56:08+5:302025-10-08T09:57:06+5:30
पावसामुळे तसेच, मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने काँक्रीटचा रस्ता, डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत

...अखेर ‘महामेट्रो’कडून रस्ते दुरुस्तीस सुरुवात; निगडी ते चिंचवड स्टेशन रस्ता होणार खड्डेमुक्त
पिंपरी : निगडी ते चिंचवड स्टेशन या सर्व्हिस रस्त्याची अखेर महामेट्रो व्यवस्थापनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. खड्डेमय रस्त्यावर डांबरीकरण केल्याने वाहनचालक समाधान करीत आहेत. यापुढे तेथे खड्डे होणार नाहीत, याची दक्षता घेण्याची मागणी करण्यात येत आहे.
निगडी ते चिंचवड स्टेशन रस्त्यावर खड्डे असे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. तसेच यासंदर्भात वारंवार वृत्त देत पाठपुरावा कायम ठेवला होता. अखेर महामेट्रो व्यवस्थापनाने रस्ते दुरुस्तीकामास सुरुवात केली आहे. खड्डेमय रस्ते दुरुस्त होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, पिंपरी ते निगडी मेट्रो विस्तारित मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यासाठी निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चिंचवडच्या एम्पायर इस्टेट या सर्व्हिस रस्ता आणि बीआरटी मार्ग महापालिकेने महामेट्रोकडे हस्तांतरित केला आहे. त्या रस्त्याचे अंतर ४.५ किलोमीटर इतके आहे. त्या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती जबाबदारी महामेट्रोकडे देण्यात आली आहे. सध्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चिंचवड स्टेशनपर्यंत मेट्रोचे काम जोरात सुरू आहे.
महापालिकेच्या पत्राला प्रतिसाद नाही...
पावसामुळे तसेच, मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने काँक्रीटचा रस्ता, डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. वर्दळीच्या वेळेत वाहतूक संथ होऊन वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागत आहेत. तातडीने खड्डे दुरुस्तीबाबत महापालिकेने महामेट्रोला तीनवेळा पत्र पाठविले. मात्र, त्याला महामेट्रो व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही. रोष वाढत असल्याने अखेर महामेट्रोने रस्ते पक्के करून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी त्या रस्त्यावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने काही काळ बंद ठेवून इतरत्र वळविण्याची मागणी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी केली होती. त्यानुसार वाहतूक पोलिस व महापालिकेने काही रस्त्यांवरील वाहतूक वळवली आहे. त्यानंतर महामेट्रोने रस्ते दुरुस्ती काम हाती घेतले आहे. निगडी ते चिंचवड स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करण्यास सोमवारी (दि.६) सुरुवात करण्यात आली आहे. पावसाने उघडीप दिल्याने दुरुस्ती काम करण्यात येत असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.