पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला चावा; रावेत पोलिस ठाण्यातील घटना

By नारायण बडगुजर | Updated: July 5, 2023 09:57 IST2023-07-05T09:57:40+5:302023-07-05T09:57:51+5:30

रावेत पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली...

Female cop bitten at police station; Incident at Rawet Police Station | पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला चावा; रावेत पोलिस ठाण्यातील घटना

पोलीस ठाण्यात महिला पोलिसाला चावा; रावेत पोलिस ठाण्यातील घटना

पिंपरी : गोंधळ घालत असलेल्या पती-पत्नीला पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्यांना समजावून सांगत असताना महिलेने पोलिसांशी हुज्जत घालून एका पोलिस महिलेच्या हाताला चावा घेतला. रावेत पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी २६ वर्षीय महिलेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिला पोलिस पौर्णिमा चव्हाण यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रावेत पोलिस ठाण्यात रविवारी रात्री कर्तव्यावर असताना त्यांना डायल ११२ वर एक कॉल आला. नवरा बायको भांडत असून त्यांचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होता. त्यानुसार फिर्यादी आणि पोलिस अंमलदार घटनास्थळी गेले. त्यानंतर महिलेला समज देण्यासाठी रावेत पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी आरोपी महिलेने पोलीस ठाण्यात आरडाओरडा करून अर्वाच्य भाषेत बोलून पोलिसांसोबत हुज्जत घातली.

फिर्यादीची वर्दीची कॉलर पकडून त्यांच्या उजव्या हाताला चावा घेऊन त्यांना जखमी केले. फिर्यादी महिला पोलिस बजावत असलेल्या सरकारी कर्तव्यात आरोपी महिलेने अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Female cop bitten at police station; Incident at Rawet Police Station