वहिनीच्या त्रासाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल
By नारायण बडगुजर | Updated: January 14, 2025 15:21 IST2025-01-14T15:21:37+5:302025-01-14T15:21:46+5:30
वृद्धाने जीवन संपवण्याअगोदर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून तपास सुरु आहे

वहिनीच्या त्रासाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल
पिंपरी : भावाच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवड येथील दळवीनगर येथे ६ जानेवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली.
रवींद्र त्रिंबक रुकारी (वय ७३) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र यांचा मुलगा विशाल रुकारी (४४, रा. दळवी नगर, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. १३) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रवींद्र यांच्या भावाच्या पत्नीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र यांच्या भावाची पत्नी रवींद्र यांना कौटुंबिक कारणांवरून त्रास देत होती. त्या त्रासाला कंटाळून रवींद्र यांनी ६ जानेवारी रोजी टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. संशयित महिलेने रवींद्र यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तसेच विशाल आणि त्यांचे वडील रवींद्र यांना धमकी दिली, असे फिर्यादित नमूद आहे. दरम्यान, रवींद्र रुकारी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पाेलिसांकडून तपास सुरू आहे.