शेतकरी कन्येची राजपत्रित अधिकारी पदाला गवसणी! निरगुडीची लेक मयुरी राज्यात मुलींमध्ये तिसरी…
By प्रकाश गायकर | Updated: January 4, 2025 18:53 IST2025-01-04T18:48:48+5:302025-01-04T18:53:30+5:30
मयुरी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथे झाले.

शेतकरी कन्येची राजपत्रित अधिकारी पदाला गवसणी! निरगुडीची लेक मयुरी राज्यात मुलींमध्ये तिसरी…
पिंपरी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या राजपत्रित अधिकारी पदाच्या स्पर्धा परीक्षेत मयुरी प्रतिभा सुरेश कदम यांनी महाराष्ट्रात मुलींमध्ये तिसरा क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे.
मूळच्या पुणे जिल्ह्यातील निरगुडी गावातील एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या मयुरी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा निरगुडी येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्री वाघेश्वर विद्यालय, चऱ्होली बुद्रुक, आणि उच्च माध्यमिक शिक्षण मॉडर्न कॉलेज, शिवाजीनगर, पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी आळंदी येथील एमआयटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीची पदवी मिळवली.
प्रशासन क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा त्यांना त्यांचे वडील आणि भावाकडून मिळाली. शालेय आणि महाविद्यालयीन काळात सामाजिक परिस्थितीची जाणीव झाल्याने त्यांनी लोकसेवेसाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तयारीच्या काळात त्यांची आई, मोठी बहीण, आणि भाऊ यांनी त्यांना संपूर्ण साथ दिली.
मयुरी कदम यांच्या या यशामुळे त्यांना समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत काम करण्याची संधी मिळाली आहे. ‘या यशामुळे आनंद होत असून, समाजसेवेसाठी उत्तम कार्य करण्याचा निर्धार आहे,’ असे मयुरी यांनी सांगितले.