महापालिकेच्या रुग्णालयात मुदतबाह्य औषधे;सांगवीच्या स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:54 IST2025-01-30T12:54:11+5:302025-01-30T12:54:15+5:30
सांगवीच्या स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहातील धक्कादायक प्रकार

महापालिकेच्या रुग्णालयात मुदतबाह्य औषधे;सांगवीच्या स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहातील धक्कादायक प्रकार
पिंपरी : सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहात प्रसूत झालेल्या महिलांसाठी चक्क मुदतबाह्य औषधे वापरली जात असल्याचे समोर आले आहे. कोविड काळात वापरली जाणारी कोव्हिशिल्ड लस तसेच इतर काही मुदतबाह्य औषधे रुग्णालयातील कपाटात आढळून आली आहेत. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी अचानक पाहणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी प्रसूतीगृहात मुदतबाह्य औषधे वापरली जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यावर मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी उपविभाग अध्यक्ष मंगेश भालेकर, अलेक्झांडर मोझेस व इतर सहकाऱ्यांना सोबत घेऊन अचानक भेट दिली. त्यावेळी कोविड काळात वापरल्या जाणाऱ्या कोव्हिशिल्ड लस आढळून आल्या. प्रसूत झालेल्या महिलांना ड्रेसिंग करण्यासाठी मुदतबाह्य बेटाडीन व इतर औषधे वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सांगवी येथील रुग्णालयात गोंधळ उडाला.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने दरवर्षी मोठ्या प्रमाणावर औषधांची खरेदी केली जाते. त्यासाठी कोट्यवधीचा खर्च केला जात आहे. मात्र, तरीही मुदतबाह्य औषधे वापरली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दरम्यान, याबाबत वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्याकडे मनसेचे कार्यकर्ते व नागरिकांनी तक्रार केली. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी औषधांच्या बाटल्यांवरील स्टिकर्स फाडून टाकले. दुसऱ्या दिवशी बायोमेडिकल वेस्ट घेऊन जाणाऱ्या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये मुदतबाह्य औषधे सापडल्याचा आरोप मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू साळवे यांनी केला आहे.
हा सर्व प्रकार संशयास्पद असून मुदतबाह्य औषधे वापरल्यामुळे सर्वसामान्य महिलांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी. - राजू साळवे, शहर उपाध्यक्ष, मनसे.
याबाबत तक्रार आली आहे. त्यासाठी मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक नेमले आहे. ते तपासणी करतील. चौकशीअंती नेमका काय प्रकार आहे, तो समोर येईल. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.