घटस्फोटानंतरही पत्नीकडून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा; पिंपरीतील धक्कादायक प्रकार
By नारायण बडगुजर | Updated: April 30, 2023 18:00 IST2023-04-30T17:56:31+5:302023-04-30T18:00:25+5:30
पत्नीच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू घडवून आणण्याच्या भीतीचे मेसेजही पती करत होता

घटस्फोटानंतरही पत्नीकडून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा; पिंपरीतील धक्कादायक प्रकार
पिंपरी : धर्मशास्त्राच्या नियमांप्रमाणे खुलानामा (मुबारातनामा) करून रितसर कागदोपत्री फारकत घेतली. त्यानंतरही घटस्फोटीत पतीने महिलेला व्हाटसअपवरून अश्लील मेसेज पाठवून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा ठेवली. हा प्रकार १३ ऑगस्ट २०२२ ते २७ एप्रिल २०२३ या कालावधीत घडला.
पीडित महिलेने याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. २९) फिर्याद दिली. त्यानुसार फिर्यादी महिलेचा घटस्फोटित पतीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिलेने खुलानामा (मुबारातनामा) व्दारे तिचा आरोपी पतीपासून धर्मशास्त्राच्या नियमांप्रमाणे रितसर कागदोपत्री फारकत घेतली. त्यानंतर फिर्यादी महिला गेल्या आठ महिल्यांपासून त्यांच्या आई-वडील आणि भाऊ यांच्यासोबत विभक्त राहत आहेत. तरी देखील आराेपी याने फिर्यादी महिलेकडून लैंगिक इच्छापुर्तीची अपेक्षा ठेवून फिर्यादी महिलेचा फोनव्दारे पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. व्हाटसअपव्दारे अश्लील मेसेजेस पाठवून फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न केली. तसेच फिर्यादी महिलेवर अचानक जिवघेणा हल्ला करण्याची भिती घातली. त्यामुळे फिर्यादी महिला आिण त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य दहशतीखाली आहेत. आरोपी हा फिर्यादी महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू घडवून आणण्याची किंवा त्यांना जबर दुखापत करण्याची आरोपी व्हाटसअपवरून सतत भिती घालत आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.