वृद्धाला एक कोटींचा घातला गंडा; शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक
By नारायण बडगुजर | Updated: May 14, 2025 20:34 IST2025-05-14T20:30:43+5:302025-05-14T20:34:10+5:30
ब्रोकरेज फी, हाय ट्रान्झेक्शन फी, सिक्युरिटी डीपॉझिट, थर्ड पार्टी हाय ट्रान्झॅक्शन विड्रोअल प्लॅटफार्म असे वेगवेगळे चार्जेस सांगून १ कोटीला लुटले

वृद्धाला एक कोटींचा घातला गंडा; शेअर मार्केटच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक
पिंपरी : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने दिघी येथील एका वृद्ध व्यक्तीची एक कोटी नऊ लाख ४७ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या दोन संशयिताना अहमदाबाद (गुजरात) येथून अटक केली.
भौमिक भरतभाई पटेल (वय २९), आकाश पोपटभाई रादडीया (२४, दोघे रा. अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दिघी येथील जेष्ठ नागरिकास फेसबुकवरून अनोळखी इसमाने ऑनलाईन ट्रेडींग संर्दभात लिंक पाठवली. त्याद्वारे व्हॉटसअप ग्रुपमध्ये सहभागी केले. त्यानंतर त्यांना त्यांचे ब्लॉक ट्रेड व आयपीओ नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. ॲप्लिकेशन व प्लॅटफॉर्मद्वारे शेअर मार्केटींग, स्टॉक मार्केटींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे अमीष दाखवले. फिर्यादी व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणुकीवर मोठा नफा झाल्याचे खोटे इलेक्ट्रॉनिक अभिलेख तयार करून दाखविण्यात येत होते. काही कालावधीनंतर फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांना ब्रोकरेज फी, हाय ट्रान्झेक्शन फी, सिक्युरिटी डीपॉझिट, थर्ड पार्टी हाय ट्रान्झॅक्शन विड्रोअल प्लॅटफार्म असे वेगवेगळे चार्जेस सांगून त्यांच्याकडून एकूण एक कोटी नऊ लाख ४७ हजार ४०० रुपये घेत फसवणूक केली. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संशयितांनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्याची माहिती पोलिसांनी काढली. एक बँक खाते अहमदाबाद (गुजरात) येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलिसांनी तात्काळ अहमदाबाद येथे जाऊन दोन्ही संशयितांना अटक केली. त्या संशयितांनी त्यांचा साथीदार दिलीप याच्यासोबत संगनमत करून फसवणुकीची रक्कम बँक अकाऊंटवर घेऊन ती आंगडीया मार्फत पुढे पाठवल्याचे सांगितले. संशयितांचा साथीदार हा नेपाळ येथे राहून अशा प्रकारचे गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. नेपाळ येथून चालवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीसोबत संशयिताचे संबंध असल्याचे समोर आले आहे. तसेच संशयितांनी फसवणुकीची रक्कम घेण्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांबाबत अनेक तक्रारी दाखल आहेत.
पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, प्रकाश कातकडे, पोलिस अंमलदार अतुल लोखंडे, दीपक माने, अभिजित उकिरडे, दीपक भोसले, नितेश बिच्चेवार, स्वप्नील खणसे, महेश मोटकर, प्रीतम भालेराव, नीलेश देशमुख, सुरंजन चव्हाण, परशुराम चव्हाण, पंकज धोटे, संतोष सपकाळ, मोनिका चित्तेवार, शुभांगी ढोबळे, दीपाली चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली.