बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई
By नारायण बडगुजर | Updated: January 14, 2025 17:14 IST2025-01-14T17:14:08+5:302025-01-14T17:14:46+5:30
हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी पबवर कारवाई केली.

बावधनमध्ये ‘दम मारो दम’; पबमधील हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई
पिंपरी : बावधन परिसरातील एका पबमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब उघडकीस आली. हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी रविवारी (दि. १२) या पबवर कारवाई केली.
बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (२१, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (३७, रा. भुगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १३) बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता गिऱ्हाईकांची गर्दी करून त्यांना जेवणास व हुक्का पिण्यास एकत्र बसविल्याचे आढळले. हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होता. याबाबत पोलिसांनी कारवाई करत हॉटेलमधील कामगार सौम्यरंजन आणि व्यवस्थापक राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच या कारवाईमध्ये सहा हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पबमधील ग्राहकांमध्येही वाद
बावधन परिसरात बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो हा एकमेव मोठा पब आहे. हा पब रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. तसेच ग्राहकांचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पबमध्ये नेहमीच वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पबमध्ये आलेल्या ग्राहकांमध्ये वाद झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
संबंधित हाॅटेलमधील दारू विक्रीचा परवाना एका महिलेच्या नावावर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच हाॅटेल मालकाचा शोध सुरू आहे. यात किती भागीदार आहेत? भाडेकरार आहे का? याबाबत तपास सुरू आहे. - अनिल विभुते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन