कलम १५५ चे आदेश संशयास्पद असल्यास थेट कारवाई, जमाबंदी आयुक्तांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 11:06 IST2025-06-13T11:06:36+5:302025-06-13T11:06:56+5:30

- भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या सात-बारा उताऱ्यांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ सात-बारा आणि हस्तलिखित सात-बारा यात अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले होते.

Direct action if Section 155 orders are suspicious, Jamabandi Commissioner warning verification of all previous orders | कलम १५५ चे आदेश संशयास्पद असल्यास थेट कारवाई, जमाबंदी आयुक्तांचा इशारा

कलम १५५ चे आदेश संशयास्पद असल्यास थेट कारवाई, जमाबंदी आयुक्तांचा इशारा

पुणे : सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर हस्तलिखित उताऱ्यातील चुका महाराष्ट्र महसूल अधिनियमाच्या कलम १५५ नुसार आदेश देऊन कमी करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यात संशयास्पद व्यवहार झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात असे आदेश तपासण्याची मोहीम हाती घेण्यात आली. आता भूमी अभिलेख विभागाने १५५ कलमानुसार राज्यात देण्यात आलेले यापूर्वीच्या सर्व आदेशांची पडताळणी करण्याचे ठरविले आहे. यात नियमबाह्य आदेश असल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिला आहे. या आदेशामुळे अनेकांचे धाबे दणाणणार असल्याची चर्चा आहे.

भूमी अभिलेख विभागाने राबविलेल्या सात-बारा उताऱ्यांच्या संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ सात-बारा आणि हस्तलिखित सात-बारा यात अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले होते. त्यानुसार पुणे विभागातील असे सात-बारा उतारा तपासण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यात विभागातील ५० हजार ४३२ सात-बारा उताऱ्यांपैकी ४४ हजार ९४१ हस्तलिखित सात-बारा उताऱ्यांमध्ये चुका आढळल्या. सर्वाधिक चुका पुणे जिल्ह्यात आढळल्या आहेत. दुरुस्त केलेला हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

याबाबत दिवसे म्हणाले, “यापूर्वी कलम १५५ नुसार झालेल्या आदेशांची तपासणी करणार आहोत. अशा प्रकारचे काही संशयास्पद आदेश असल्यास त्यांची नोंद घेतली जाणार आहे. अशा संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कारवाईचे अधिकार आहेत. त्यांना तशी करवाई करण्याचे निर्देश दिले जातील. तसेच यापुढे १५५ कलमानुसार होणाऱ्या सर्व आदेशांची नोंद ऑनलाईन ठेवली जाणार आहे. त्याची ठराविक अंतराने पडताळणी केली जाईल. हे आदेश कुणी दिले, कसे दिले याची संपूर्ण नोंद यापुढे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीच्या आदेशांना आळा बसेल.”

पुणे विभागात झाली होती तपासणी

सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण करताना तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या पातळीवर हस्तलिखित उताऱ्यातील नावे व क्षेत्र चुकविणे, नवीन शर्तीचे शेरे, कूळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारीपड बाबतचे शेरे, वारसांच्या नोंदी वैध व कायदशीर नोंदी कलम १५५ नुसार आदेश देऊन कमी करण्यात आल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केल्या. त्या तक्रारींची दखल घेऊन राज्य सरकारने तत्कालिन पुणे विभागीय आयुक्त सौरव राव यांना गेल्या १० वर्षांतील अशा सातबारा उताऱ्यांच्या तपासणीचे आदेश दिले होते. जुना हस्तलिखित सात-बारा आणि संगणकीकृत केलेला सातबारा हा एकसारखा तपशील असलेला (मिरर इमेज) असावा, याची खातरजमा करण्याचे आदेश राव यांनी दिले होते. त्यानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. विभागातील पाच जिल्ह्यांमधून सुमारे ५० हजार ४३२ सातबारा उताऱ्यांसंबंधी आदेश देण्यात आले होते. आयुक्तालयाने याचा एकत्रित अहवाल राज्य सरकारला पाठविला आहे.

Web Title: Direct action if Section 155 orders are suspicious, Jamabandi Commissioner warning verification of all previous orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.