पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:32 IST2018-12-06T14:26:38+5:302018-12-06T14:32:54+5:30
पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात.वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे.

पवना थडीच्या ठिकाणावरुन सत्ताधाऱ्यांत मतभेद
पिंपरी : महिला बचतगटांसाठी बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. दरवर्षी या जत्रेत वाद होण्याची परंपरा कायम राखली आहे.यंदाची जत्रा भोसरी की चिंचवड यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद, वाद निर्माण झाले आहे. महिला व बालकल्याण समितीने दोन परस्परविरोधी ठराव केले आहेत. त्यामुळे नक्की जत्रा कोठे होणार याबाबत संभ्रम आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची सभा झाली.अध्यक्षस्थानी स्वीनल म्हेत्रे होत्या. पुण्यातील भीमथडी जत्रेच्या धर्तीवर महापालिकेने गेल्या बारा वर्षांपासून पवनाथडी जत्रेचे आयोजन केले जाते. महिला व बाल कल्याण योजने अंतर्गत पवनाथडी जत्रा भरविली जाते. पवनाथडी कोेठे घ्यायची यावरून दरवर्षी वाद होत असतात. चिंचवड आणि भोसरीवरून पुन्हा वाद झाला. दरवर्षी जत्रेबाबत शेवटपर्यंत गोंधळ सुरू असतो.
महिला व बालकल्याण समितीच्या सभेत अगोदर भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारीला पहिल्या किंवा दुस-या आठवड्यात जत्रा भरविण्याबाबतचा ठराव केला. त्यानंतर पुन्हा सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारीला पहिल्या अथवा दुस-या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव केला. त्यामुळे यंदाची जत्रा नक्की कोठे होणार याबाबत संभ्रम आहे.
सभापती स्वीनल म्हेत्रे म्हणाल्या, समितीने यापूर्वी पवनाथडी जत्रा भोसरीगाव जत्रा मैदान येथे भरविण्याबाबतचा ठराव केला होता. मात्र, आता त्यात बदल करून सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात फेब्रुवारीला पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जत्रा भरविण्याचा ठराव करण्यात आला आहे. ठिकाण बदल करण्याचे कारण सांगता येणार नाही.
शिवसेनेच्या सदस्या मीनल यादव म्हणाल्या, पवना पवनाथडी जत्रा भोसरीगाव जत्रा मैदान येथे जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भरविण्याबाबतचा सभेत ठराव करण्यात आला आहे. त्यानंतर सत्ताधा-यांनी ठिकाणामध्ये बदल केल्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही.