Delhi violence : पिंपरी-चिंचवड शहरातील शांततेसाठी पाेलिसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 16:42 IST2020-02-27T16:41:05+5:302020-02-27T16:42:45+5:30
दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच शांतता ठेवण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड पाेलिसांकडून करण्यात आले आहे.

Delhi violence : पिंपरी-चिंचवड शहरातील शांततेसाठी पाेलिसांचे आवाहन
पिंपरी : आपल्या शहरातील शांतता भंग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यावी. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून करण्यात आले आहे.
सीएए, एनआरसी या कायद्यांच्या विरोधात तसेच समर्थनार्थ देशात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यातील दिल्ली येथील आंदोलन चिघळले असून, त्यात काही जणांचा बळी गेला. त्यामुळे सोशल मीडियावरून अफवांचे पेव फुटले आहे. या आंदोलनाला वेगळे वळण देऊन देशातील इतर भागात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सोशल मीडियातील संदेशांतून होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड सायबर सेलचा सोशल मीडियावर ‘वॉच’ आहे.
सध्याच्या परिस्थितीत आपल्या शहरातील शांतता भंग होणार नाही, याची दक्षता प्रत्येक नागरिकाने घ्यावी. सोशल मीडियावर आमचे लक्ष आहे. जबाबदारीने सोशल मीडियावरील संदेशांची देवाण-घेवाण करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्याला काही आक्षेपार्ह आढळल्यास पोलीस नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर कॉल करा, असे आवाहन या ‘ट्वीट’मधून करण्यात आले आहे.
सीएए, एनआरसी या कायद्यांच्या विरोधात तसेच समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड शहरात देखील यापूर्वी विविध संघटनांकडून शांततेत आंदोलन करण्यात आले आहे. त्यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. असे असले तरी दिल्लीतील आंदोलन चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून अधिक खबरदारी घेण्यात येत असून, शहरात शांतता राखण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.