coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 425 जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 15:35 IST2020-03-27T15:34:00+5:302020-03-27T15:35:11+5:30
संचारबंदी असताना विनाकारण फिरणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड पाेलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 425 जणांवर गुन्हे
पिंपरी : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात 16 मार्चपासून जमावबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली. तसेच केंद्र सरकारने देखील देशभरात लॉक डाउन केले आहे. याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड शहरात 11 दिवसांत 425 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात 20 मार्च रोजी कोरोनाचा बारावा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. गेल्या आठवड्यात शुक्रवारपर्यंत देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात होते. त्यामुळे महापालिका व पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी 16 मार्च रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदी लागू केली. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी देखील जनता कर्फ्यूनंतर लगेचच संचारबंदी केली होती. त्यानंतर राज्य शासनाने ही संचारबंदी पुढे कायम ठेवली आहे. या कालावधीत जमावबंदी व संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे काही प्रकार समोर आले.
जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवेची दुकाने, आस्थापने वगळून इतर सर्व व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत काही व्यावसायिकांकडून दुकाने सुरू असल्याचे समोर येत आहेत. तसेच काही नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरताना दिसून येत आहेत. संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अशा व्यावसायिक व नागरिकांवर पोलिंसाकडून कारवाई करण्यात येत आहे.
भारतीय दंड विधान कलम १८८ अन्वये ही कारवाई केली आहे. त्या अंतर्गत 16 ते 26 मार्च दरम्यान 425 गुन्हे दाखल झाले आहेत. यात गुरुवारी (दि. 26) विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 62 गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच काही वाहनचालकांना दंडुक्यांचा चोप देण्यात आला तर काहींना पोलिसांनी रस्त्यावरच उठाबशा काढण्यास सांगितले.
गल्लीबोळांतील टोळक्यांना पागंवले
शहरातील मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांची ये-जा या रस्त्यांवर दिसून येते. मात्र शहरातील काही भागांतील गल्लीबोळात काही नागरिक एकत्र येत आहेत. टोळक्याने गप्पांची मैफल रंगविली जात आहे. त्यामुळे जमावबंदी व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन त्यांच्याकडून होत आहे. अशा टोळक्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. अशा टोळक्यांवर व गल्लीबोळात हुल्लडबाजी करणा-यांवर देखील कारवाई करून पोलिंसाकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.