कंपन्या अन् शाळांकडे ४२३ कोटींची थकबाकी...! महापालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:39 IST2025-01-21T14:38:25+5:302025-01-21T14:39:25+5:30

टाटा मोटर्स कंपनीच्या मोकळ्या जमिनींचा १५० कोटींचा मालमत्ताकर थकीत आहे. मात्र

Companies and schools owe Rs 423 crores...! Municipal Corporation starts sealing properties | कंपन्या अन् शाळांकडे ४२३ कोटींची थकबाकी...! महापालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात

कंपन्या अन् शाळांकडे ४२३ कोटींची थकबाकी...! महापालिकेकडून मालमत्ता सील करण्यास सुरुवात

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई मोहीम तीव्र केली आहे. प्रतिसाद न देणाऱ्या मालमत्ता सील करून जप्त करण्यात आल्या आहेत. त्यातील ४३ मालमत्तांचा लिलावही सुरू करण्यात आला आहे. थकबाकी असलेल्या शाळा व मालमत्ता सील करण्यात येत आहेत. शहरातील शाळा व खासगी कंपन्यांकडून तब्बल ४२३ कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी असल्याची करसंकलन विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

ज्या थकबाकीदारांनी नोटीस देऊन टाळाटाळ केली, अशा थकबाकीदारांची मालमत्ता जप्त करण्यात येत आहे. निगडी, आकुर्डी, सांगवी, फुगेवाडी दापोडी, भोसरी, चिंचवड, थेरगाव, पिंपरी वाघेरे, पिंपरीनगर, चऱ्होली, चिखली, मोशी, तळवडे, किवळे, दिघी बोपखेल करसंकलन विभागीय कार्यालयातील वसुली पथकामार्फत थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीस देण्याची कार्यवाही सुरू आहे.
 
सर्वेक्षणात आढळले म्हणून...
महापालिकेने केलेल्या मालमत्ता सर्वेक्षणात सापडलेल्या खासगी कंपन्या आणि शाळांकडून मागील तीन वर्षांचाच कर महापालिका वसूल करत आहे. मात्र, या मालमत्ता गेल्या दहा-बारा वर्षांपासून तिथे अस्तित्वात आहेत. मात्र, त्यांनी कर बुडविण्याच्या उद्देशानेच कर आकारणी विभागाकडे नोंदणीच केली नव्हती. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. त्यांच्याकडून मागील कर वसूल करण्यासही महापालिका असमर्थता दर्शवित असल्याचे चित्र आहे.

दीडशे कोटींचा कर थकवूनही ‘टाटा’ला नोटीस नाही...
निवासी व बिगरनिवासी थकबाकीदार असणाऱ्या मिळकतधारकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या मोकळ्या जमिनींचा १५० कोटींचा मालमत्ताकर थकीत आहे. मात्र, कंपनीला महापालिकेने कोणतीही नोटीस दिलेली नाही. २००० पासून महापालिकेने खुल्या जागांना नियमानुसार कर लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार, टाटा मोटर्स कंपनीच्या महापालिका भवन, चिंचवड आणि चिखली करसंकलन विभागाच्या कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागांना मालमत्ता कर आकारण्यात आला. त्यानंतर कंपनीने याबाबत विविध न्यायालयात दाद मागितली आहे. तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यांना यावर्षी विभागाकडून मिळकत कर बिले बजावण्यात असून, त्यांना अद्याप महापालिकेने कोणतीही नोटीस देण्यात आली नाही.

सातबारा उताऱ्यावर थकबाकीचा ‘बोजा’ चढवणार!
पाच लाखांहून अधिक थकीत रक्कम असणाऱ्या थकबाकीदारांनी येत्या दहा दिवसांमध्ये थकीत कर भरावा, अन्यथा आपल्या सातबारा उताऱ्यावर थकीत रकमेचा बोजा चढवला जाणार आहे. थकबाकीदारांनी कराचा त्वरित भरणा करून सातबारा उताऱ्यावर थकीत रकमेचा बोजा दाखल करण्याची कारवाई, मालमत्ता जप्तीची व मालमत्ता लिलावाची कारवाई टाळावी. कर जमा न करणाऱ्या थकबाकीदारांवर यापुढे महापालिका धडक मोहीम राबवून कर वसुली करणार आहे. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, महापालिका.

Web Title: Companies and schools owe Rs 423 crores...! Municipal Corporation starts sealing properties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.