चिंचवडमध्ये ६७.५ मि.मी. पाऊस; जोरदार सरींनी उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:25 IST2025-05-21T15:24:24+5:302025-05-21T15:25:08+5:30
पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारपासून वळवाच्या सरी कोसळत आहे

चिंचवडमध्ये ६७.५ मि.मी. पाऊस; जोरदार सरींनी उडाली तारांबळ
पिंपरी : जोरदार पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही पिंपरी-चिंचवडमध्ये हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट अनुभवायला मिळाला. पुणे परिसरात मंगळवारी सर्वाधिक म्हणजे ६७.५ मि.मी. पावसाची नोंद चिंचवडमध्ये झाली. अचानक आलेल्या वळवाच्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.
पिंपरी-चिंचवड परिसरात सोमवारपासून वळवाच्या सरी कोसळत आहेत. शहर परिसरामध्ये सोमवारी सायंकाळी २७ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. उकाडाही जाणवत होता. दुपारी तीननंतर ढग जमायला सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट सुरू होता. वादळी वाऱ्याने शहर परिसरातील या भागांमध्ये रस्त्यांवर झाडे पडण्याच्या घटना घडल्या. पावसामुळे शहरातील रस्त्यांवरील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत सुरू होती. सायंकाळी काही काळ हवेमध्ये गारवा जाणवत होता.
वीजपुरवठा खंडित
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, खराळवाडी, दापोडी, भोसरी, नाशिकफाटा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. उन्हाळ्याच्या कालखंडामध्ये वीज खंडित झाल्याने उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
गाव, मिलिमीटर
चिंचवड - ६७. ५
डुडुळगाव -४३. ५
तळेगाव -१४