charges filed against youngster who writes on facebook group | चार - दोन कार्ट्यांना गोळ्या घाला पण...
चार - दोन कार्ट्यांना गोळ्या घाला पण...

पिंपरी : ऐतिहासिक गड, किल्ले हॉटेल व्यवसाय करण्यासाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची चर्चा आहे. या निर्णयाच्या विरोधात राज्यभर सरकारविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. असे असताना सोशल मीडियावरील फेसबुक अकाउंटवरून यासंबंधित आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने एकावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 


‘गड किल्ल्यांना विरोध करणाऱ्या चार दोन कार्ट्यांना गोळ्या झाडा, एकही कार्ट गडाजवळ थांबणार नाही, मुख्यमंत्री साहेब तुम्ही निर्णय मागे घेऊ नका’, अशा आशयाची पोस्ट ‘एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा अ‍ॅड होईल त्याने १०० अ‍ॅड करावे’ या ग्रुपवर व्हायरल झाली आहे. 
  यासंबंधी पराग पुरुषोत्तम जोशी (वय ४०, रा. भालके टॉवर, निंबाळकर प्लाझाजवळ, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी एकावर भा. दं. वि. कलम १५३ (अ), सह आयटी अ‍ॅक्ट कलम ६६ (सी) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. ९) रात्री साडेनऊच्या सुमारास निदर्शनास आला आहे.


  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पराग पुरुषोत्तम जोशी यांच्या फेसबुक अकाउंटवरील फोटोचा व नावाचा वापर करून दिनेश आर. सूर्यवंशी यांच्या फेसबूक अकाउंटवरून ‘एक करोड मराठ्यांचा फेसबुक ग्रुप जो एक मराठा अ‍ॅड होईल त्याने १०० अ‍ॅड करावे’ या ग्रुपवर अशी आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केली होती. चिंचवड पोलीस पुढील तपास करीत आहेत.


Web Title: charges filed against youngster who writes on facebook group
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.