'चंद्रभागा प्राधिकरणा'मध्ये आता जिल्हास्तरीय समिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 09:07 IST2025-02-12T09:06:35+5:302025-02-12T09:07:20+5:30
पहिल्याच बैठकीमध्ये पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार

'चंद्रभागा प्राधिकरणा'मध्ये आता जिल्हास्तरीय समिती
पुणे : चंद्रभागा नदी निर्मळ, पवित्र आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नमामि चंद्रभागा प्राधिकरणात विभागीय समितीनंतर आता जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. अभियानाची योग्य अंमलबजावणी आणि विकेंद्रीकरणासाठी पुणे, सोलापूर जिल्ह्यात ही समिती असेल. पुण्याच्या समितीच्या पहिल्याच बैठकीत पुढील तीन वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
या प्राधिकरणाला २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. देहू नगरपंचायतीने भुयारी गटार योजनेसाठी १३ कोटी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने विविध कामांसाठी २९ कोटींचा प्रस्ताव ठेवला आहे. हे प्रस्ताव विभागीय कार्यकारी समितीला पाठविण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या विभागीय कार्यकारी समितीत पुणे, सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त, दोन्ही जिल्हा
परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक, भूजल आयुक्तांसह १९ सदस्य आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय कार्यकारी समितीत १३ सदस्य असतील त्यात निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव आहेत.
विविध १७ कामे होणार
नमामि चंद्रभागा अभियानांतर्गत १७प्रकारची कामे केली जाणार आहेत. नदीच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी सांडपाणी प्रक्रियेसाठी यंत्रणा उभारणे, भीमा नदी व तिच्या उपनद्यांमध्ये राडारोडा नदीत टाकण्यात टाकला जाणार नाही याची दक्षता घेणे, नदीचे काठ, पात्र यांचे संरक्षण, जतन आणि संवर्धन करणे, नदीकाठावरील पूररेषेतील विहिरींचे मॅपिंग आणि जतन करणे आधी कामे केली जाणार आहेत.