सीसीटीव्हीच्या बॅटरी, यूपीएस चोरणारा गजाआड;संत तुकारामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By नारायण बडगुजर | Updated: February 8, 2025 16:09 IST2025-02-08T16:09:15+5:302025-02-08T16:09:32+5:30
पाच लाख ९८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पिंपरी येथील संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई

सीसीटीव्हीच्या बॅटरी, यूपीएस चोरणारा गजाआड;संत तुकारामनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- नारायण बडगुजर
पिंपरी : सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटरी तसेच यूपीएस चोरी करणाऱ्या संशयिताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १७ बॅटऱ्या आणि २१ यूपीएस व एक दुचाकी असा पाच लाख ९८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पिंपरी येथील संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
बुध्दभुषण प्रवीण डोंगरे (२२, रा. घरकुल, चिखली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विविध उपक्रमाअंतर्गत शहरातील मुख्य रस्ते व चौकांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचे यूपीएस व बॅटरी चोरी करून नेण्याचे प्रकार वाढले होते. याबाबत कारवाई करण्याच्या वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम सुरू केली.
दरम्यान, संत तुकारामनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाचे पाेलिस उपनिरीक्षक शाकिर जिनेडी यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलिस अंमलदार जावेद मुजावर यांना ५ फेब्रुवारी रोजी माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार बुध्दभुषण डोंगरे याने सीसीटीव्ही यंत्रणेचे साहित्य चोरी करून लपवून ठेवले आहे. तसेच काही साहित्य विक्रीसाठी तो चिंचवड एमआयडीसी येथे येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित बुध्दभुषण डोंगरे याला शिताफिने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बॅटरी, यूपीएस आणि दुचाकी असा एकूण ५ लाख ९८ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. संत तुकारामनगर, एमआयडीसी भोसरी आणि काळेवाडी या पोलिस ठाण्यांमधील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे.