डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 22:30 IST2025-11-12T22:30:32+5:302025-11-12T22:30:52+5:30
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
पिंपरी : वैयक्तिक वादातून मित्रांनी डोक्यात गोळी झाडून व्यावसायिकाचा खून केला. दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे बुधवारी (दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
नितीन शंकर गिलबिले (वय ३७, रा. वडमुखवाडी, चऱ्होली) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. अमित जीवन पठारे (३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन गिलबिले आणि इतर काही जण अलंकापुरम रस्त्यावरील शेडजवळ थांबले होते. त्यावेळी नितीन यांचा मित्र असलेला संशयित अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे फाॅर्च्यूनर कार घेऊन तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवले. त्यानंतर गिलबिले यांच्या अलंकापुरम रस्त्यावरील हाॅटेलच्या दिशेने ते गेले. दरम्यान संशयितांनी नितीन गिलबिले यांच्यावर गोळी झाडली. यात नितीन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खुनाचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय
नितीन गिलबिले यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आईवडील, भाऊ असा परिवार आहे. नितीन यांनी काही महिन्यांपूर्वी अलंकापुरम रस्त्यावर हाॅटेल सुरू केले होते. तसेच व्यावसायिक गाळे बांधून त्यांनी भाडेतत्त्वावरही दिले. जमीन-खरेदी विक्रीचा व्यवसाय देखील ते करत होते.