पिंपरीत आता बीआरटी मार्गावरील बसस्टॉपही असुरक्षित! एकाने चोरली दरवाजाची चौकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2021 13:03 IST2021-05-02T13:03:32+5:302021-05-02T13:03:48+5:30
बीआरटी मार्गाचे रखवालदार पेट्रोलिंग करताना घडली घटना

पिंपरीत आता बीआरटी मार्गावरील बसस्टॉपही असुरक्षित! एकाने चोरली दरवाजाची चौकट
पिंपरी :बीआरटी मार्गावर असणारे बसस्टॉपही आता असुरसक्षित झाले आहे. पिंपरीत रस्त्यावर फिरणाऱ्या एकाने अक्षरशः स्टॉपवरील दरवाजाची चौकट चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. दापोडी येथे शुक्रवारी ही घटना घडली.
अल्लासेन हुसेन बेजन मंडल (वय २०, रा. पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नरहरी नारायण शिंदे (वय ५१, रा. खडकी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हे पीएमपीएमएलच्या बीआरटी मार्गासाठी रखवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते शुक्रवारी सकाळी त्यांच्या साथीदारांसह दापोडी येथील बीआरटी मार्गावर पेट्रोलिंग करत होते. त्याठिकाणी अल्लासेन मंडल बसस्टॉपवर असणाऱ्या दोन हजार रुपये किमतीची ॲल्युमिनियम दरवाजाची चौकट चोरताना दिसला. त्याच क्षणी शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला पकडले. भोसरी पोलिसांशी संपर्क साधून त्याला त्यांच्या ताब्यात दिले. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.