बुलेट रायडर्सला 'फटाक्यां'ची हौस भारी ; २५ लाखांचा दंड वसूल तरी 'मस्ती'ठरतेय शिरजोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 15:02 IST2021-02-19T14:46:28+5:302021-02-19T15:02:27+5:30
वाहनांचे बुलेटचे फटाके ठरताहेत डोकेदुखी

बुलेट रायडर्सला 'फटाक्यां'ची हौस भारी ; २५ लाखांचा दंड वसूल तरी 'मस्ती'ठरतेय शिरजोरी
नारायण बडगुजर-
पिंपरी : कर्णकर्कश्य हाॅर्न तसेच सायलेन्सरचा आवाज असलेल्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत आहे. तरीही काही बेशिस्त काही नागरिकांनी त्यांच्या वाहनांचे माॅडिफिकेशन केले आहे. फटाक्यांचा आवाज काढणारे बुलेटवाले अद्यापही शहरात आहेत. असे वाहनचालक रात्री मोकळ्या रस्त्यांवरून भरधाव वाहन चालवून कर्णर्कश्य हाॅर्न वाजवितात तसेच बुलेटवालेही सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढतात.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यात वाहनाचे माॅडिफिकेशन करणारे वाहनधारक रडारवर आहेत. त्यांच्यावर कारवाई करून आर्थिक दंडही आकारत आहेत. तरीही नियमांचे उल्लंघन होत आहे. वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर दिवसभर कारवाई केली जाते. वर्दळ व वाहनांअभावी रात्री मोकळ्या असलेल्या रस्त्यांवर बुलेटवाले रात्री सायलेन्सरने फटाक्यांचा आवाज काढून शहरवासियांची झोपमोड करीत आहेत.
भरवस्ती, रुग्णालय, बाजारपेठ, चाैक तसेच वर्दळीच्या ठिकाणी काही दुचाकीस्वार भरधाव दुचाकी चालवितात. तसेच विचित्र आवाजाचे हाॅर्न वाजवून गर्दीचे लक्ष केंद्रीत केले जाते. यातून वायू प्रदूषण केले जाते. तसेच सार्वजनिक शांततेताचाही भंग होतो. हे प्रकार रोखण्यासाठी मोटार वाहन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येत आहे.
म्यझिकल हाॅर्न लावणे पडले महागात
शहरातून पुणे-मुंबई, पुणे - नाशिक, बेंगळूरू-मुंबई हे महामार्ग गेले आहेत. तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर हा मार्ग एमआयडीसीतून गेला आहे. या मार्गांवर बस, ट्रक, कंटेनर, अशा अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. यातील बहुतांश वाहनांना म्युझिकल हाॅर्न बसविलेले असतात. अशा वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील काही दुचाकी, टेम्पो व इतर वाहनांनाही असे हाॅर्न बसविल्याचे दिसून येते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे असे हाॅर्न बसविणे या वाहनचालकांना महागात पडले आहे.
बेशिस्त चालकांवर सुरूच होणार....
वाहनचालकांनी कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करू नये. यातून त्यांच्या स्वत:सह इतरांच्याही सुरक्षेला धोका असतो. अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई सुरूच राहणार आहे.
- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग
वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई
कर्णकर्कश्य व म्युझिकल हाॅर्न वाजविणे : २०२० - २२९ - एक लाख १० हजार ३००
२०२१ (१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी) - ५२ - २६ हजार
बुलेट सायलेन्सर माॅडिफिकेशन - २०२० - २५५२ - २५ लाख ५२ हजार
२०२१ (१ जानेवारी ते १७ फेब्रुवारी) - ६४१ - सहा लाख ४१ हजार