हॉकर झोनसाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद; शेखर सिंह यांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 09:15 IST2025-01-18T09:14:17+5:302025-01-18T09:15:12+5:30
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाला महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

हॉकर झोनसाठी अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद; शेखर सिंह यांची ग्वाही
पिंपरी : महापालिका शहरातील पथ विक्रेत्यांसाठी विशेष आर्थिक नियोजन तसेच हॉकर्स झोन निर्मितीसाठी दहा कोटींपेक्षा अधिक रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या शिष्टमंडळाला गुरुवारी (दि. १६) महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी आयुक्त शेखर सिंह तसेच उपायुक्त मुकेश कोळप यांची भेट घेऊन फेरीवाला योजनाबाबत चर्चा केली. यावेळी कामगार नेते काशीनाथ नखाते, नवनियुक्त शहर विक्रेता समिती सदस्य किरण साडेकर, राजू बिराजदार, किसन भोसले, सलीम डांगे, प्रल्हाद कांबळे, अलका रोकडे यांच्यासह महासंघाच्या महिलाध्यक्षा वृषाली पाटणे, कार्याध्यक्ष इरफान चौधरी आदी उपस्थित होते.
महापालिका कार्यक्षेत्रामध्ये अतिक्रमण कारवाईत वाढ झाली असून, साहित्य आणि माल जप्त करण्यात येत आहे. हे अन्यायकारक असून, कारवाई थांबविण्यात यावी. लवकरच फेरीवाल्यांना प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावे. तसेच आगामी अर्थसंकल्पामध्ये दहा कोटी रुपयांची तरतूद करावी व नियोजनासाठी लवकरच समितीची बैठक घ्यावी, अशी मागणी नखातेंसह समिती सदस्यांनी केली. त्यावर हॉकर्स झोनसाठी अंदाजपत्रकात दहा कोटींपेक्षा अधिक आर्थिक तरतूद करू, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
‘लवकरच फेरीवाला प्रमाणपत्राचे वाटप’
फेरीवाला प्रमाणपत्र लवकर वाटप करण्यात येईल. याबाबत लवकर बैठक घेऊन नियोजन करण्याबाबत आयुक्त यांनी आश्वासन दिले आहे. तसेच, सुसज्ज हॉकर झोन निर्मितीसाठी आपण चांगल्या पद्धतीने नियोजन करणार असल्याचेही आयुक्त सिंह यांनी यावेळी फेरीवाला समितीला सांगितले.