लग्न कधी करायचे याबाबत विचारणा केल्याने प्रेयसीला दिले गरम चावीचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 17:01 IST2019-05-03T16:57:58+5:302019-05-03T17:01:47+5:30
प्रेयसीनी लग्न कधी करायचे असे विचारल्याने प्रियकराने लायटरने चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे.

लग्न कधी करायचे याबाबत विचारणा केल्याने प्रेयसीला दिले गरम चावीचे चटके
पिंपरी : प्रेमसंबंध असलेल्या तरुणीने आपल्या प्रियकराला लग्न कधी करायचे असे विचारल्याने प्रियकराने प्रेयसीला गाडीची चावी लाईटरवर गरम करून त्याचे चटके दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी अमित लाड व मोहन लाड (रा. रामराज्य बिल्डिंग, कासारवाडी, पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २३ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१४ पासून ते १३ एप्रिल २०१९ पर्यंत सुरू होता. भोसरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिडित मुलगी व अमित लाड यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. यामुळे मुलीने अमितला लग्नाची गळ घातली. २०१८ मध्ये ती त्याला नाशिकफाटा येथील एसटी स्टँड वर लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी गेली असता त्याने तिला शिवीगाळ व मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीची चावी लाईटवर गरम करून चटके दिले. त्यावेळी तरुणीने त्याची गाडी पकडून ठेवली आहे हे माहित असताना देखील त्याने तिला फरफटत नेले. यामध्ये तरुणीची दोन्ही पायांना दुखापत झाली. तसेच १३ एप्रिलला अमित तिला भेटण्यासाठी मोशी येथील तिच्या घरी गेला. तेथे त्याने तिचा विनयभंग केला. वडील मोहन लाड यांनी तिला शिवीगाळ करत नातेवाईकांमध्ये बदनामी केली. फौजदार टोके या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.