पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 14:48 IST2018-08-08T14:47:18+5:302018-08-08T14:48:44+5:30
देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.

पिंपरीत पिस्तुल व जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
पिंपरी : देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास पिंपरी पोलिसांनी भाटनगर येथे केली. विकास कांबळे (वय २८, रा. पत्राशेड, पिंपरी) आणि अमीर उर्फ राजा युसुफ शेख (वय १८, रा. पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील भाटनगर येथे दोनजण दुचाकीवरून आले असून त्यांच्याजवळ पिस्तुल असल्याची खात्रीशीर माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचून पोलीस पथक तेथे गेले. भाटनगर कमानीजवळ उभे असलेल्या विकास आणि अमीर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.