पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नियुक्त्या रखडल्या

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: July 3, 2025 10:09 IST2025-07-03T10:09:03+5:302025-07-03T10:09:57+5:30

चारही आमदारांच्या दबावापुढे शहराध्यक्षांचे काही चालेना? : महापालिका निवडणुका तोंडावर असतानाही निर्णय नसल्याने कार्यकर्ते सैरभैर

BJP appointments in Pimpri-Chinchwad city stalled The city president was unable to do anything under pressure from all four MLA | पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नियुक्त्या रखडल्या

पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपच्या नियुक्त्या रखडल्या

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्या रखडल्या आहेत. महापालिका निवडणुका तोंडावर असतानाही प्रमुख पदांवरील नियुक्त्या जाहीर झालेल्या नाहीत. या विलंबामागे शहरातील आमदारांचा दबाव असल्याचे बोलले जात असून, त्यामुळे पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे निर्णय घेऊ शकत नसल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे.

शहर भाजपमध्ये सरचिटणीस, महिला मोर्चा, युवक मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, सोशल मीडिया सेल आदी विविध पदांवर नियुक्त्या अपेक्षित होत्या. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी तयारी केली होती. मात्र, ही नावे निश्चित करताना आमदार आणि माजी पदाधिकाऱ्यांमधील वर्चस्वाची स्पर्धा आडवी येत आहे. शहरात भाजपकडे विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. या आमदारांचा आपापल्या गटातील कार्यकर्त्यांना पदे मिळावीत, यासाठी जोरदार दबाव आहे.

एका माजी पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, शहरातील आमदारांच्या दबावामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. एकत्र बसून निर्णय घेण्याऐवजी प्रत्येकजण आपापल्या गटासाठी जोर लावत आहे. याचा परिणाम पक्षाच्या एकसंधतेवर होत आहे.

कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण

कित्येकवेळा बैठकांचे आयोजन होऊनही नियुक्त्या लांबणीवर टाकण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. आम्ही दीर्घकाळ पक्षासाठी मेहनत घेतली, निवडणुका लढवल्या, मोर्चे काढले. आता नियुक्त्यांमध्ये आमचे नावसुद्धा घेतले जात नाही, अशी प्रतिक्रिया काही जुन्या कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

‘विचार सुरू आहे’ आणि ‘लवकरच घोषणा’

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्याकडे नियुक्त्यांची जबाबदारी असली तरी, त्यांचे निर्णय स्थानिक आमदारांच्या सहमतीशिवाय मंजूर होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काटे अनेकदा ‘विचार सुरू आहे’, ‘लवकरच घोषणा करू’ असे सांगत वेळ मारून नेत आहेत.

राजकीय गणित आणि निवडणूक डावपेच

या नियुक्त्यांमागे फक्त संघटनात्मक धोरण नसून, त्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीची पायाभरणी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोणत्या गटाला किती प्रतिनिधित्व मिळते, यावर भविष्यात उमेदवारी कुणाला मिळेल, हे ठरणार असल्याने ही रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे. काही इच्छुक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्वतःच्या नियुक्तीची चर्चा रंगवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गोंधळ वाढत असून, अधिकृत घोषणेशिवाय गाजावाजा करणे पक्षशिस्तीच्या विरोधात असल्याचे वरिष्ठांनी सूचित केले आहे.

नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. येत्या पंधरा दिवसांत लवकरच नवे पदाधिकारी घोषित करण्यात येतील. - शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप

 

Web Title: BJP appointments in Pimpri-Chinchwad city stalled The city president was unable to do anything under pressure from all four MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.