हॉर्न वाजविल्याने मारहाण करून लुटले, थेरगावातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 21:44 IST2021-06-22T21:42:19+5:302021-06-22T21:44:36+5:30

तरुण जखमी; एकाला अटक

Beaten to youth due to horn sounded, incident in the thergaon | हॉर्न वाजविल्याने मारहाण करून लुटले, थेरगावातील घटना

हॉर्न वाजविल्याने मारहाण करून लुटले, थेरगावातील घटना

पिंपरी : हॉर्न वाजविला म्हणून गाडीला लाथा मारल्या. त्यानंतर तरुणास मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली. थेरगाव येथे ४ जून रोजी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. 

अक्षय चिमाजी ढवळे (वय २३, रा. कैलासनगर, थेरगाव), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह विकी मल आणि आकाश (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मयुर प्रकाश गिरी (वय २१, रा. काळाखडक, वाकड), असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दुचाकीवरून जात असताना त्यांनी त्यांच्या दुचाकीचा हॉर्न वाजविला. यामुळे आरोपींनी त्यांच्या गाडीला लाथ मारून खाली पाडले. आरोपी विकी मल याने फिर्यादीच्या डोक्‍यात बाटली मारून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खिशातील सहा हजार २०० रुपयांची रोकड व इतर कागदपत्र जबरदस्तीने काढून घेतली. तसेच मोबाइल रस्त्यावर आपटून नुकसान केले. आरोपी ढवळे याने फिर्यादीच्या गाडीची चावी जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादीने बचावासाठी आरडा ओरडा केला असता काही नागरिक मदतीसाठी आले. मात्र त्यावेळी आरोपी विकी मल याने हातातील बाटली उंचावून मोठमोठ्याने ओरडून जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक निरीक्षक संभाजी जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Beaten to youth due to horn sounded, incident in the thergaon