तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक

By नारायण बडगुजर | Updated: February 25, 2025 18:11 IST2025-02-25T18:09:31+5:302025-02-25T18:11:11+5:30

घुसखोराकडे तपासणी केली असता पश्चिम बंगाल येथील भारतीय मतदान कार्ड, बांगलादेश येथील लोहागारा, जि. नराईल येथील शाळेचा दाखला असे आढळून आले

Bangladeshi infiltrator living under three different names arrested from Bhosari | तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक

तीन वेगवेगळ्या नावाने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी घुसखोराला भोसरीतून अटक

पिंपरी : तीन वेगवेगळ्या नावाने भारतामध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी व्यक्तीला भोसरीपोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. २३) रात्री साडेआठच्या सुमारास बनाचा ओढा, भोसरी येथे करण्यात आली.

अटक केलेल्या संशयिताकडे नयन रतन सरकार (२१, रा. क्रिष्णापूर, लोहागारा, जि. नराईल, बांगलादेश), राकेश रतन सरकार (रा. घोला नादिया, पश्चिम बंगाल), सुमित शंकर भक्ता (रा. नाकाशी पारा, पश्चिम बंगाल) अशा तीन नावांची कागदपत्रे आढळून आली. त्याचे मूळ नाव नयन सरकार असे आहे. तो सध्या लेबर कॅम्प, दिघी येथे वास्तव्य करत होता. त्याने बांगलादेश येथून पश्चिम बंगालमध्ये अनधिकृतपणे घुसखोरी करून प्रवेश केला. त्यानंतर तो कामाच्या निमित्ताने पुणे येथे आला होता.

भोसरी पोलिसांकडून दररोज रात्री सहा ते नऊच्या कालावधीत नाकाबंदी लावली जाते. रविवारी नाकाबंदी सुरू असताना एक दुचाकीस्वार संशयितपणे जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात तफावत आढळून आली. त्याच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या नावाची कागदपत्रे आढळून आली. तसेच तो बांगलादेशी असल्याचे निदर्शनास आले. नादिया पश्चिम बंगाल येथील भारतीय मतदान कार्ड, बांगलादेश येथील लोहागारा, जि. नराईल येथील लक्ष्मीपाशा आदर्श सेकंडरी स्कुल या शाळेचा दाखला आढळून आला.

भोसरी पोलिसांनी नयन रतन सरकार याला अटक केली. परकीय नागरिक आदेश, परकीय नागरिक कायदा यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो मागील एक वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरात बेकायदेशीर वास्तव्य करत आहे. तसेच मेस आणि कन्स्ट्रक्शन साईटवर काम करत होता. नयन सरकार याला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव तपास करीत आहेत.

Web Title: Bangladeshi infiltrator living under three different names arrested from Bhosari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.