नाट्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच साकारणार बालनगरी; लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार शहर
By विश्वास मोरे | Updated: January 3, 2024 16:18 IST2024-01-03T16:18:21+5:302024-01-03T16:18:41+5:30
येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलामध्ये मुख्य सोहळा होणार

नाट्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच साकारणार बालनगरी; लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार शहर
पिंपरी : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची यंदा शंभरी आहे. पिंपरी चिंचवड शहरात होणाऱ्या शंभराव्या नाट्य संमेलनाची तयारी सुरु आहे. प्रथमच लहान मुलांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारली आहे. त्यात मुलांसाठी बालनाट्ये आणि कार्यक्रम सादर होणार आहेर. महापालिका शाळांच्या मुलांनाही बालनगरीत सहभागी होता येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागात नाट्य संमेलनाचे कार्यक्रम होणार आहेत. येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलामध्ये मुख्य सोहळा होणार आहे.
अशी आहे बालनगरी
नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारली आहे. चिंचवड भोईरनगर येथील मैदानावर बालनगरी उभारली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येपासून शुक्रवारी अनौपचारिक उदघाटन होणार आहे. त्यानंतर दोन्ही दिवसही या बालनगरीत लहान मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम आहेत. बालनाट्य नगरीमधील विविध कार्यक्रमांची निवड प्रकाश पारखी, धनंजय सरदेशपांडे, रुपाली पाथरे , मयूरी जेजुरीकर, गौरी लोंढे या बालनाट्य चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या समितीने केली आहे.
नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, 'आजपर्यंत ९९ नाट्य संमेलन झाली, मात्र, यामध्ये लहान मुलांसाठी एखाद दुसरं नाटक किंवा बाल गीतांचा कार्यक्रम व्हायचा. त्यामुळे नाट्य संमेलनात लहान मुलांचा सहभाग हा कमी प्रमाणात दिसायचा. परंतु १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेताना आम्ही जाणीवपूर्वक लहान मुलांसाठी 'बालनगरी' हा एक वेगळा रंगमंच ठेवला आहे. लहान मुलांना बालपणापासूनच नाटकाची गोडी लागावी, त्यांच्यावर नाटकाचे संस्कार व्हावेत, हा यामागील उद्देश आहे. पूर्वसंध्येला स्थानिक बाल कलाकारांच्या विविध कार्यक्रमाबरोबरच , सुट्टी गाजवलेले ' बोक्या सांतबंडे' हे व्यावसायिक बालनाट्य, ग्रीप्स थिएटर चे गोष्ट सिंपल पिल्लाची , बालगीते, पपेट शो हे खास मुलांसाठी आकर्षण असणार आहे. तसेच क्लाऊन माईम अक्ट अक्ट हा प्रकार पिंपरी - चिंचवड मध्ये पहिल्यांदाच सादर होणार आहे.'
बालनगरीसाठी महापालिका शाळांना निमंत्रण
भाऊसाहेब भोईर म्हणाले, 'नाट्य संमेलन काळात बालनगरीत विविध रंगारंग कार्यक्रम असणार आहेत. हे पाहण्यासाठी आम्ही महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी, झोपडपट्टी भागात असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थी यांना आमंत्रीत केले आहे, कारण तिकीट काढून असे कार्यक्रम त्यांना अनुभवता येणार नाहीत. तसेच इतरही लहान मुलं यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद लुटतील.'