डोक्यात दगड घालून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 20:50 IST2019-08-10T20:49:52+5:302019-08-10T20:50:34+5:30
कंपनीतून सुटल्यानंतर पायी चालत घरी निघालेल्या तरुणाच्या डोक्यात अज्ञात इसमाने दगड घालून खुनाचा प्रयत्न केला.

डोक्यात दगड घालून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
पिंपरी : कंपनीतून सुटल्यानंतर पायी चालत घरी निघालेल्या तरुणाच्या डोक्यात अज्ञात इसमाने दगड घालून खुनाचा प्रयत्न केला. यात तरुण गंभीर जखमी झाला. भोसरी येथील लांडेवाडी येथे गुरुवारी (दि. ८) सायंकाळी साडेसातला ही घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल विष्णू धावडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाचे वडील विष्णू ठकसेन धावडे (वय ५२, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विष्णू धावडे यांचा मुलगा राहुल हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तो नहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर पायी घरी जात होता. त्या वेळी भोसरीतील लांडेवाडी येथील अग्निशामक केंद्राजवळील बस थांब्याजवळ कोणीतरी अज्ञात इसमाने पाठीमागून येऊन राहुल याच्या डोक्यात दगड घातला. त्याच्या डोक्याला व हनुवटीला गंभीर इजा झाली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.