गुन्हेगारांना अटक करून त्यांची धिंड काढा ; अजित पवार यांची पोलिसांना सूचना
By नारायण बडगुजर | Updated: February 6, 2025 18:31 IST2025-02-06T18:30:05+5:302025-02-06T18:31:06+5:30
पुण्यात कोयता गँग, कोयता कुठून येतो? अशा गुन्हेगारांना अटक करून त्यांची धिंड काढा

गुन्हेगारांना अटक करून त्यांची धिंड काढा ; अजित पवार यांची पोलिसांना सूचना
नारायण बडगुजर
पिंपरी : पुण्यात कोयता गँग, कोयता कुठून येतो? अशा गुन्हेगारांना अटक करून त्यांची धिंड काढा, अशी सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय इमारतीचे गुरुवारी भुमीपूजन झाले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. पोलिसांच्या इमारतीसाठी तसेच वाहन व इतर सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले, गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आणि पुण्याच्या पोलिस आयुक्तांनाही आम्ही सांगत असतो. पोलिसांच्या कामकाजात आमचा राजकीय हस्तक्षेत आहे का? तरीही पुण्यातील बिबवेवाडी आणि येरवड्यात वाहने फोडल्याची घटना घडली. का होतयं असं? कोयता गँग कुठून आली? त्यांचा बंदोबस्त करा, मोका लावा. काय करायचे ते करा. पोलिसांना मुभा आहे. पोलिसांसाठी एवढ्या इमारती उभारतोय. पोलिसांना वाहने कमी पडू देत नाही. पुणे ग्रामीण पोलिसांना ॲण्टी ड्रोन गन दिल्या. पोलिसांना जे पाहिजे ते द्यायला सरकार तयार आहे. वाहन फोडल्यानंतर एक आरोपी पोलिसांनी पकडला. अशा आरोपींची धिंड काढा. यातून सर्वांना कळलं पाहिजे की, कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा किंवा छोट्या बापाचा नाही.
कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी...
नागरिकांनीही चुकीचं वागू नये. नियम, संविधानानुसार राहिले पाहिजे. कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, कोणाच्या जवळचा लांबचा असो, कायद्याचे पालन झालेच पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमध्ये अजिबात होता कामा नये...
आता येथे पुण्याचे सीपी पाहिजे होते. त्यांनाही मी ऐकवलं असतं. तोडफोडीचं सत्र पुण्यातील बिबवेवाडी, येरवड्यात चालू आहे तसं पिंपरी-चिंचवडमध्ये तर अजिबात होता कामा नये. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी त्यासाठी खबरदारी घ्यावी. नाहीतर ही सर्व कामे बंद करून टाकू. मग कशाला पाहिजे तुम्हाला अशा इमारती, असा सवाल करत अजित पवार यांनी गुन्हेगारांवर कारवाईच्या पोलिसांना सूचना केल्या.
कौतुक अन् नाराजीही
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची इमारत आणि शिवनेरी सभागृहाचे अजित पवार यांनी कौतुक केले. तर देहूरोड येथील गेस्ट हाऊसच्या स्ट्रक्चर विषयी नाराजी व्यक्त केली. त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.