महावितरणाच्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाच घेताना रंगेहाथ पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 18:56 IST2018-07-27T18:52:40+5:302018-07-27T18:56:24+5:30
वीजमीटर नावावर करुन देण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी करणाऱ्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात अाली अाहे.

महावितरणाच्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाच घेताना रंगेहाथ पकडले
पिंपरी : वीजमीटर व वीजजोड ग्राहकांच्या नावावर करण्यासाठी लाच मागणाऱ्या महावितरण कंपनीच्या ताथवडे शाखेच्या कनिष्ठ कार्यालयीन सहायकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी महावितरण कार्यालयाच्या ताथवडे शाखेसमोर करण्यात आली.
गजानन सुरेश यादव (वय ३९) असे कनिष्ठ कार्यालयीन सहायकाचे नाव आहे. यातील तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी विकसित केलेल्या इमारतींमधील नवीन वीजमीटर व वीजजोड संबंधित ग्राहकांच्या नावावर करण्यासाठी ताथवडे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत अर्ज केला होता. दरम्यान, वीजमीटर व वीजजोड ग्राहकांच्या नावावर करुन देण्यासाठी यादव यांनी १० हजार ४०० रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार नोंदवली.
त्यानंतर सापळा रचण्यात आला. यामध्ये यादव यांना दहा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.