संतापजनक! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्याने प्रकार आला उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 19:12 IST2021-06-16T19:10:20+5:302021-06-16T19:12:44+5:30
आरोपी हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून पीडित मुलगी इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे.

संतापजनक! सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार; गरोदर राहिल्याने प्रकार आला उघडकीस
पिंपरी : अल्पवयीन असलेल्या १७ वर्षीय मुलीवर तिच्या सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केला. तसेच कोणाला काहीही न सांगण्याची धमकीही दिली. मात्र अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. बिजलीनगर, चिंचवड येथे १५ एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी बुधवारी (दि. १६) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार २१ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता, त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी ही आरोपीची सख्खी लहान बहीण आहे. आरोपी हा इंजिनियरिंगचे शिक्षण घेत आहे. तर पीडित मुलगी इयत्ता बारावीमध्ये शिकत आहे. ते दोघेही भाऊ-बहीण त्यांच्या राहत्या घरात हॉलमध्ये झोपले होते. त्यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत बळजबरी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कोणास काही एक न सांगण्याची धमकीही आरोपीने दिली. मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. वैद्यकीय तपासणी केली असता, पीडित मुलगी आठ आठवड्याची गरोदर राहिल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक नीता उबाळे तपास करीत आहेत.