एकट्याने भंगार विक्रीचे पैसे घेतले; मित्राने काटा काढला अन् साथीदारालाच संपवले
By प्रकाश गायकर | Updated: June 23, 2023 19:45 IST2023-06-23T19:45:41+5:302023-06-23T19:45:57+5:30
हिंजवडी पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीला अटक केले

एकट्याने भंगार विक्रीचे पैसे घेतले; मित्राने काटा काढला अन् साथीदारालाच संपवले
पिंपरी : नेपाळी कामगाराचा खून केल्याची घटना बुधवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी हिंजवडीपोलिसांनी २४ तासाच्या आत एकाला अटक केली. भंगार विक्रीतून मिळालेले पैसे न दिल्याच्या कारणावरून हा खून झाला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. प्रेमबहादुर करण थापा (वय ४०, रा. राजु दगडे चाळ, पाटीलनगर, बावधन, पुणे) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. अनिलकुमार राई (वय ३३) याला पोलिसांनी अटक केली आहे. रंजन सुधीर विशु (वय ४८), रतनसिंग मनोहरसिंग चौहान (वय ६५) यांना पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास रामनगर बावधन येथे थापा याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी डोक्यात मारहाण करून खून केला होता. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी हिंजवडी पोलिसांनी दोन पथके तयार केली. दरम्यान पोलीस अंमलदार ओम कांबळे यांना माहिती मिळाली की, प्रेमबहादुर थापा आणि त्याचा एक साथीदार मागील तीन चार दिवसांपासून रामनगर बावधन येथे फिरत होते. तिथेच असलेल्या म्हसोबा मंदिरात ते झोपत होते. मात्र प्रेमबहादूर याचा साथीदार बुधवार (दि. २०) दुपारपासून गायब झाला आहे. तो बावधन येथील एका कंपनीत काम करत होता. पोलिसांनी कंपनीत जाऊन त्याची माहिती घेतली. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचा ठावठिकाणा शोधला. तो पुण्यातील कोंढवा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
बुधवारी दुपारी तो आझाद नगर कोंडवा येथील नातेवाईकांकडे आला होता. त्यानंतर तो वानवडी येथील त्याच्या नेपाळी मित्राकडे गेला असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वानवडी येथील नेपाळी वस्तीत जाऊन आरोपीचा शोध घेतला. आरोपी अनिलकुमार याला पोलिसांनी सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. अनिल कुमार आणि प्रेमबहादुर हे एकत्र भंगार गोळा करून ते विकून त्यातून पैसे कमवत होते. दरम्यान प्रेमबहादूर यानी एकट्याने भंगार विक्रीचे पैसे घेतले. त्यातील अनिलकुमार याचा हिस्सा त्याला न दिल्याने प्रेमबहादुरच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले.