पिंपरीत पोलिसांचे आॅपरेशन आॅलआऊट; १५० जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 20:34 IST2018-07-14T20:33:04+5:302018-07-14T20:34:22+5:30
शहरात १५ दिवसांच्या फरकाने लगेच दुसऱ्यांदा आॅपरेशन आॅलआऊट करण्यात आले. यामध्ये सुमारे १५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरीत पोलिसांचे आॅपरेशन आॅलआऊट; १५० जणांवर कारवाई
पिंपरी : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात १५ दिवसांच्या फरकाने लगेच दुसऱ्यांदा आॅपरेशन आॅलआऊट करण्यात आले. यामध्ये सुमारे १५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम शुक्रवारी रात्री परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आॅपरेशन आॅलआऊट राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार घोषित केलेले अशा गुन्हेगारांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला. भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे, वेगात वाहन चालविणारे अशा विविध स्वरूपाच्या कृत्यात सहभागी असणाऱ्या सुमारे १५० जणांवर कारवाई करण्यात आली.
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगार यांचा शोध घेत असताना मैदाने आणि मोकळ्या जागा येथे गटाने थांबून टवाळकी करणारे, भरधाव दुचाकी चालवून स्टंटबाजी करणारे यांचाही शोध घेण्यात आला. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आले होते. त्या भागात पोलिसांनी ही मोहीम राबविली. या मोहिमेच्या कालावधीत जे पोलिसांच्या हाती लागले, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.